119 कोटी 66 लाखांच्या मदतीचे वितरण; उर्वरित शेतकऱ्यांना दोन दिवसांत मिळणार रक्कम
छत्रपती संभाजीनगर : Farmer Advance Payment- दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या पाच हजार रुपये अग्रीम मदतीचे वितरण जिल्ह्यात सुरू झाले आहे. जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे ११९ कोटी ६६ लाखांची मदत जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत पुढील दोन दिवसांत रक्कम जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.
दुष्काळामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांत मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात आली. पात्र लाभार्थ्यांची निवड करताना ॲग्रीस्टॅक प्रणालीतील माहिती आणि फार्मर आयडीच्या आधारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या डेटाचा वापर करण्यात आला. या माहितीची पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर संबंधितांच्या बँक खात्यांत मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
जिल्ह्यातील एकूण ५ लाख ९२ हजार २७१ शेतकऱ्यांचा डेटा अपलोड करण्यात आला असून, त्याला जिल्हास्तरावरून मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत २ लाख ३९ हजार ३२० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांतही लवकरच रक्कम जमा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
सुटीच्या दिवशीही काम सुरू
मदत वितरणाची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी आणि पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा तसेच तालुका पातळीवरील कार्यालयांमध्ये वेगाने काम सुरू आहे. शासकीय सुटीच्या दिवशीही अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. बँक खात्यांत मदत जमा करण्याच्या प्रक्रियेतील उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, हा या मदतीमागील उद्देश आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी स्पष्ट केले.
तालुका अग्रीम वाटप शेतकरी
१) छत्रपती संभाजीनगर १७,०३६
२) गंगापूर ३२८५५
३) कन्नड ३८,१९१
४) खुलदाबाद १०,८०४
५) पैठण ३२,८०५
६) फुलंब्री १५,६५०
७) सिल्लोड ३१,८१५
८) सोयगाव १४,७२३
९) वैजापूर ४५,४४१
एकूण २,३९,३२०
महत्त्वाचे मुद्दे
Read About : BAMU Career-Oriented Courses – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे नवे दालन
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.