Ad Advertisement Ad Advertisement

Dia Mirza Diwali video controversy- दिया मिर्झाच्या व्हिडीओ प्रकरणात उच्च न्यायालयाने झापले

धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्ध राजकारण दुर्दैवी; व्हिडीओ पुन्हा प्रसारित करण्याचे आदेश


Dia Mirza Diwali video controversy : मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री दिया मिर्झाचा महापालिकेच्या अधिकृत समाजमाध्यामावरून प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओवरून सुरू झालेल्या राजकारणावर उच्च न्यायालयाने मंगळवारी ताशेरे ओढले. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सार्वजनिक आणि सामाजिक हितासाठी पुढे येणाऱ्या सेलिब्रेटींच्या निवडीला राजकीय नेत्यांकडून दिला जाणारा जातीय रंग आणि त्यावरून सुरू झालेले राजकारण हे अत्यंत दुर्दैवी आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्ध असून कोणलाही सण साजरा करण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करून दियाचा व्हिडीओ पुन्हा प्रसारित करण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले.

संबंधित नेतेमंडळींनी विधान करताना न्यायालयाच्या आधीच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले; त्यानुसार, या जनजागृती मोहिमेत सेलिब्रेटींना सहभागी होण्यास सांगितले होते. दिया मिर्झा यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार वायू प्रदूषणाबाबत खूप चांगला संदेश दिला होता, परंतु त्यावर घेतलेला आक्षेप अत्यंत दुर्दैवी असल्याचे निरीक्षण न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने नोंदवले. त्याचवेळी, महापालिका आयुक्तांनी मिर्झा यांच्याबाबत घेतलेला निर्णय योग्य असून हा निर्णय न्यायालयाच्या आदेशानुसार आणि तो कायद्याच्या चौकटीतच आहे. त्यामुळे, आयुक्तांच्या आदेशाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही. तथापि, लोकप्रतिनिधींबाबत आम्हाला आदर आहे.

मात्र, मिर्झा यांच्यावरून जे राजकारण झाले ते दुर्दैवी असल्याचा पुनरूच्चार न्यायालयाने केला. एखादी व्यक्ती समाजाबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी पुढे येते. बहुमूल्य वेळ काढून तुम्हाला देते, मग तुम्ही संकुचित वृत्तीने त्या व्यक्तीकडे का पाहता, असा दृष्टिकोन कशासाठी? जात, पंथ किंवा धर्माचा विचार न करता, आपण आरोग्य आणि पर्यावरणाबद्दल बोलतो, तेव्हा तिथे वैयक्तिक स्वार्थ किंवा संकुचित विचार बाजूला ठेवणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. मुळात हा पूर्णपणे पर्यावरणाशी संबंधित विषय असून त्याला इतर कोणताही रंग देऊ नये. आमची सर्वोच्च प्राथमिकता पर्यावरण आहे. त्यामुळे, ‘आम्ही’ असे म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ ‘जनता’ असा असून त्यात सर्व जाती, पंथ आणि धर्मांचे जागरूक नागरिक समाविष्ट असल्याचेही न्यायालयाने म्हटले.

मुंबई सर्वधर्म समभावावर टिकून

मुंबई ही सर्वधर्म समभावाने आणि समाजाप्रति असलेल्या दृढभावनेवर टिकून आहे. अशा परिस्थितीत, अशी बेजबाबदार वक्तव्यांमुळे ही एकता विस्कळीत होऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. किती राजकीय नेत्यांनी स्वत: जनजागृती केली त्यासंबंधित व्हिडीओ प्रसारित केले, अशी विचारणाही न्यायालयाने केली. आपण एक धर्मनिरपेक्ष देश आहोत. या प्रकारामुळे आम्हाला मनापासून दु:ख झाले आहे. सार्वजनिक पदांवर असलेल्या व्यक्तींकडून सामाजिक भान जपणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने सुनावले.

भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र

भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून समाजोपयोगी, पर्यावरणीयदृष्ट्या आवश्यक समस्येवर जनजागृती करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विरोध कसा केला जाऊ शकतो? असा संतप्त प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, अशा प्रकारे या मुद्द्याचे राजकारण करून आदेशाचे पालन करणाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करू नका. दिवाळी हा सण जात किंवा धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वंजण साजरा करतात. मिर्झा यांच्या सहभागावर धार्मिक आधारावर आक्षेप घेण्याचे कारण काय? लोकप्रतिनिधींकडून हे अपेक्षित नाही, असे खडेबोलही न्यायालयाने सुनावले.

दिया मिर्झावरून महायुतीत ठिणगी
भाजपच्या विरोधाला शिंदे सेनेचे प्रत्यत्तर

सत्ताधारी-मित्रपक्षांतील मतभेद उघड
मुंबई : पालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी जनजागृती मोहिमेतील अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी या व्हिडीओवर आक्षेप घेतल्यानंतर महापालिकेने तो सोशल मीडियावरून हटवला. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनीही दिया मिर्झावर टीका केली. मात्र, भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना शिंदे गटाने या भूमिकेला छेद देत दिया मिर्झाची पाठराखण केली आहे.


उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेने सुरू केलेल्या जनजागृती मोहिमेचा हा एक भाग होता. मात्र, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी सोशल मीडियावरून या व्हिडीओला आक्षेप घेताना, ‘दिवाळी कशी साजरी करावी, याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून घेण्याची गरज नाही. आमच्या परंपरा आणि संस्कृती खोलवर रुजलेल्या आहेत,’ अशी भूमिका मांडली. त्यानंतर काही तासांतच महापालिकेने हा व्हिडीओ हटवला. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनीही दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी, हे शिकवण्याची गरज नाही, असे सांगत तिची पूर्वीची विधाने आणि भूमिका यांचाही संदर्भ देत दिया मिर्झाला भाजप आणि महायुतीशी संबंधित उपक्रमांपासून दूर ठेवण्याची भूमिका मांडली.
शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनीही जोरदार टीका करत, दिया मिर्झाने यापूर्वी काय विधाने केली, याचा या विषयाशी संबंध नाही. दिवाळीत फटाक्यांबाबत तिने केलेले आवाहन शंभर टक्के योग्य आहे, असे स्पष्ट केले. तसेच रितू तावडे यांना महापौरपदाची जबाबदारी सांभाळणे शक्य नसेल तर खुर्ची खाली करून दाखवा, शिवसेनेच्या ताब्यात महापौरपद द्या, असे आव्हानही दिले आहे.
या प्रकरणी पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आयुक्त आश्विनी भिडे यांना निवेदन देत, राजकीय दबावापुढे झुकून न्यायालयीन निर्देशांच्या अनुषंगाने तयार केलेला दिया मिर्झा यांचा जनजागृतीपर व्हिडीओ हटविणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या कारणास्तव हटविण्यात आला, याची चौकशी करून निर्णयप्रक्रियेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी केली.

सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय संघर्ष
महापालिकेच्या प्रदूषणमुक्त दिवाळी मोहिमेत अन्य कलाकारांचे आणि क्रिकेटपटूंचे व्हिडीओ अद्याप सोशल मीडियावर कायम असताना केवळ दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवण्यात आल्याने या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दिया मिर्झाच्या समर्थनार्थ शिंदे सेनेने घेतलेली भूमिका ही भाजपच्या भूमिकेपेक्षा वेगळी असल्याचे स्पष्ट झाले असून, या निमित्ताने महापालिकेतील सत्ताधारी मित्रपक्षांमधील राजकीय संघर्षाला नवा मुद्दा मिळाला आहे.

Read About : Justice Manmohan Diwali message – दिवाळी जबाबदारीने साजरी करा; न्यायदानातूनही प्रकाश पसरवा!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.