भारतासह तीन देशाचे संयुक्त संशोधन हवामान अनुकूल मासेमारीला मिळणार नवी दिशा
कोची : Bay of Bengal Fisheries Research Network – समुद्राचे वाढते तापमान, मान्सूनमधील अनिश्चितता आणि सागरी प्रवाहांतील बदल यांचा थेट परिणाम माशांच्या उपलब्धतेवर होत आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारीचे नियोजन करणे आव्हानात्मक बनले आहे. या समस्येवर वैज्ञानिक उपाय शोधण्यासाठी भारतासह चार देशांनी ऐतिहासिक पुढाकार घेतला आहे. भारत, श्रीलंका, बांग्लादेश आणि मालदीव यांनी एकत्र येत बंगालच्या उपसागरातील मत्स्यव्यवसाय अधिक हवामान अनुकूल करण्यासाठी ‘बीओबी-एनओआर’ या प्रादेशिक संशोधन नेटवर्कची स्थापना केली आहे.
उपग्रह निरीक्षणांपासून सागरी संशोधनापर्यंत
‘बे ऑफ बंगाल नेटवर्क ऑफ ओशन रिसर्चर्स फॉर फिशरीज’ असे या नेटवर्कचे पूर्ण नाव आहे. कोची येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्थेत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान याचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये अमेरिका, ब्राझील, चिली, पोर्तुगाल, ब्रिटन आणि ग्रीस येथील सागरी शास्त्रज्ञांनीही सहभाग घेतला.
या नेटवर्कच्या माध्यमातून उपग्रह निरीक्षणे, महासागर सर्वेक्षण, हवामान निर्देशक आणि मत्स्यव्यवसायाची आकडेवारी एकत्रित केली जाणार आहे. समुद्राचे तापमान, मान्सूनमधील बदल, पाण्याची क्षारता आणि सागरी प्रवाहांचा माशांचे स्थलांतर, प्रजनन व उपलब्धतेवर होणारा परिणाम अभ्यासला जाईल.
अंदाजाऐवजी शास्त्रीय नियोजनावर भर
आतापर्यंत पकडलेल्या माशांच्या प्रमाणावर आधारित मत्स्यव्यवस्थापन केले जात होते. मात्र, आता हवामानविषयक माहितीच्या आधारे भविष्यातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजन केले जाणार आहे. यामुळे मच्छिमारांना वेळेवर सागरी माहिती आणि अधिक अचूक मार्गदर्शन मिळण्यास मदत होऊ शकते.
सागरी माहितीचे महत्त्व
‘बे ऑफ बंगाल नेटवर्क ऑफ ओशन रिसर्चर्स फॉर फिशरीज’चे संचालक डॉ. पी. कृष्णन यांनी हे नेटवर्क सागरी संशोधन आणि मत्स्यव्यवस्थापन यांच्यातील दरी कमी करेल, असे सांगितले. केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त सचिव सुरभी राय यांनी हा उपक्रम जागतिक स्तरावर आदर्श ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. आयसीएआरच्या माजी उपमहासंचालक बी. मीनाकुमारी यांनीही अचूक सागरी माहितीचे महत्त्व अधोरेखित केले.
मच्छिमारांच्या उपजीविकेला सुरक्षितता आणि सागरी संपत्तीचे संवर्धन
या नेटवर्कचा समन्वय बीओबीपी-आयजीओ करणार असून जीईओ ब्लू प्लॅनेट आणि ट्रेव्हर प्लाट सायन्स फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. समुद्रातील बदल रोखणे शक्य नसले, तरी विज्ञानाच्या मदतीने त्यांचे परिणाम समजून घेता येतील. चार देशांच्या या संयुक्त प्रयत्नांतून मच्छिमारांच्या उपजीविकेला सुरक्षितता आणि सागरी संपत्तीच्या संवर्धनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
Read About: Near-Death Experiences – काहींचा शेवटचा प्रवास रंगहीन, काहींचा रंगमय
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.