Ad Advertisement Ad Advertisement

Near-Death Experiences – काहींचा शेवटचा प्रवास रंगहीन, काहींचा रंगमय

बोगदे अंधारलेले; रुंद, वक्र जागांना रंगांची सोबत

लंडन : Near-Death Experiences – काहींचा शेवटचा प्रवास रंगहीन तर काहींचा रंगांनी भरलेला असतो. शेवटच्या श्वासावेळी ज्यांना बोगदे दिसतात त्यांच्या वाट्याला अंधार येतो तर ज्यांना रुंद आणि वक्र जागा दिसतात ते रंगाच्या साथीने पुढे मार्गक्रमण करतात. मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या लोकांच्या अनुभवातून ही आगळीवेगळी गोष्ट समोर आली.
मृत्यूला हुलकावणी दिलेल्या लोकांपैकी अनेक जण एका अंधाऱ्या बोगद्याचे आणि त्याच्या टोकाला दिसणाऱ्या तेजस्वी प्रकाशाचे वर्णन करतात. पण सगळ्यांनाच असा बोगदा दिसत नाही. काहींना अथांग, प्रकाशाने भरलेली जागा दिसते. या वेगवेगळ्या अनुभवांमागे काही ठरावीक नियम आहे का, याचा शोध एका नव्या अभ्यासात घेण्यात आला आहे.

अभ्यासात 50 जणांचा सहभाग

फ्रान्स लर्नर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असा अनुभव घेतलेल्या ५० लोकांची मदत घेतली. त्यांना आपले अनुभव शब्दांऐवजी चित्रांमधून मांडायला सांगितले. त्यासाठी भौमितिक आकारांचा एक तयार चित्र-संच त्यांना देण्यात आला होता. ऑनलाइन सत्रांमध्ये त्यांनी आपला अनुभव वेगवेगळ्या टप्प्यांत विभागला. प्रत्येक टप्प्यात दिसलेल्या जागेचा आकार, त्यातील आपले स्थान, हालचाल आणि आठवणारे रंग त्यांनी चित्रांत रेखाटले.

चार प्रकारच्या जागा

या चित्रांमध्ये जागांचे चार मुख्य प्रकार दिसले. बोगद्यासारख्या निमुळत्या जागा, कमानीसारख्या रुंद आणि वक्र जागा, सपाट व हलक्या वळणाच्या जागा आणि चेंडूच्या आतल्यासारख्या सर्व बाजूंनी वेढणाऱ्या जागा. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे आकार आणि रंग यांचा संबंध. बोगद्यासारख्या २८ जागांपैकी २२ जागा रंगहीन होत्या. त्या काळ्या, पांढऱ्या, करड्या किंवा फक्त प्रकाशाच्या स्वरूपात दिसल्या. उलट, रुंद आणि वक्र अशा ३१ जागांपैकी २७ जागा रंगीत दिसल्या.

वैज्ञानिक कारण

मेंदू किंवा डोळ्यांना रक्त व ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला की नजर आकुंचन पावते आणि बोगद्यासारखे दिसू लागते. मंद प्रकाशात डोळ्यांची रंग ओळखण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे बोगदे रंगहीन दिसत असावेत, असा अंदाज आहे. सर्व बाजूंनी वेढणाऱ्या जागांचे अनुभव ‘गँझफेल्ड इफेक्ट’शी मिळतेजुळते आहेत. सतत एकसारखे, रिकामे दृश्य पाहत राहल्यिास माणसाला विचीत्र भास होऊ शकतात. या अभ्यासाला मर्यादाही आहेत. इतर विलक्षण अनुभवांशी तुलना करणारा गट यात नव्हता. त्यामुळे हे आकार फक्त मृत्यूजवळच्या अनुभवांपुरतेच आहेत का, हे अजून सांगता येत नाही. हा अभ्यास ‘फ्रंटियर्स इन सायकॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसद्धि झाला आहे.

Read About : AI Impact on Jobs – ‘एआय’मुळे ‘एआय’मुळे मोठा धोका, तयारीत राहा, जोहोचे संस्थापक वेम्बू यांचा इशारा

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.