बोई नॅशनल पार्कमध्ये दशकभराहून अधिक काळ सुरू असलेल्या चिपांझींच्या वर्तनाने शास्त्रज्ञही चक्रावले
वॉशिंग्टन : CHIMPANZEE STONE THROWING पश्चिम आफ्रिकेतील जंगलांतील चिपांझी मागील १० वर्षांहून अधिक काळापासून विशिष्ट झाडांवर सातत्याने दगड मारत असून, शास्त्रज्ञांच्या एका आंतरराष्ट्रीय गटाने या रहस्यमयी आणि दुर्मिळ वर्तनाचा शोध लावला आहे. गिनी-बिसाऊ येथील बोई नॅशनल पार्क मध्ये चिपांझींचे हे कृत्य कॅमेरा ट्रॅप आणि ऑडिओ रेकॉर्डरमध्ये कैद झाले आहे.
संवादाचे माध्यम की सांस्कृतिक विधी?
संशोधनात असे दिसून आले आहे की, प्रामुख्याने प्रौढ नर चिपांझी ठराविक झाडांची निवड करतात आणि त्यावर वारंवार दगड फेकून मारतात. या सततच्या दगडफेकीमुळे त्या झाडांच्या बुंध्याशी आता दगडांचे मोठे ढीग तयार झाले आहेत, ज्याचा वापर ते एका दशकापेक्षा जास्त काळ करत आहेत. दगड फेकताना चिपांझी एका विशिष्ट लयीत मोठ्याने ओरडतात आणि आपले हात-पाय झाडाच्या खोडावर जोरात आपटतात. शास्त्रज्ञांच्या मते, हे केवळ मनोरंजनाची कृती नाही, तर ती त्यांची स्वत:ची संस्कृती असून एकमेकांशी संपर्क साधण्याचे किंवा आपली सीमा निश्चित करण्याचे एक सांकेतिक माध्यम असू शकते.
मानवी उत्क्रांतीशी संबंध
चिपांझी हे मानवाच्या सर्वात जवळचे मानले जात असल्याने, त्यांच्या या दगडफेकीच्या पद्धतीवरून मानवी उत्क्रांतीदरम्यान सुरुवातीच्या काळात संवादाची आणि दगडांच्या हत्यारांची सुरुवात कशी झाली असावी, हे समजून घेण्यास मदत होऊ शकते. या संशोधनात शास्त्रज्ञांनी एक चिंताजनक बाब देखील समोर आणली आहे. गिनी-बिसाऊ मधील या जंगलांमध्ये सध्या बॉक्साईट खाणकामाचे प्रकल्प सुरू झाले आहेत. या औद्योगिकीकरणामुळे चिपांझींच्या निवासस्थानाचा नाश होत असून, त्यांची ही दुर्मिळ स्थळे कायमची नष्ट होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
