खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी; १ लाख ८० हजारांचा ऐवज चोरीला
छत्रपती संभाजीनगर : Gold Necklace Theft दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत ग्राहक बनून आलेल्या दोन महिलांनी सोन्या-चांदीची खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानदाराची नजर चुकवून १८.६१० ग्रॅम वजनाची तब्बल १ लाख ८० हजार रुपये किमतीची सोन्याची कंठी चोरून नेल्याची घटना एन-११ हडको येथील टीव्ही सेंटर परिसरातील अजिंक्य ज्वेलर्समध्ये ४ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंक्य दहीवाळ (३३, रा. एन-१२ हडको) यांचे टीव्ही सेंटर परिसरात अजिंक्य ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दिवाळीमुळे दुकानात ग्राहकांची गर्दी होती. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.२७ ते ४.५० वाजेदरम्यान तोंडाला स्कार्फ बांधलेल्या दोन महिला दुकानात आल्या. त्यापैकी एकीने पिवळ्या रंगाची साडी, तर दुसरीने निळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. महिलांनी सुरुवातीला ६ हजार १०० रुपये किमतीचे चांदीचे दोन हत्ती खरेदी केले आणि रोख पैसे दिले. त्यानंतर सोन्याच्या मण्यांची कंठी दाखवण्याची मागणी केली. दुकानदाराने त्यांना २२ कॅरेटची १८.६१० ग्रॅम वजनाची, १ लाख ८० हजार रुपये किमतीची कंठी दाखवली. यावेळी दुकानदार इतर ग्राहकांचे बिल तयार करण्यात व्यस्त होता, तर सेल्समन महिलांना चैनचा ट्रे दाखवत होता. याच संधीचा फायदा घेत दोन्ही महिलांनी नजर चुकवून सोन्याची कंठी स्वत:जवळ लपवली. त्यानंतर चांदीच्या हत्तींचे बिल घेऊन त्या रिक्षातून पसार झाल्या.
सीसीटीव्हीत चोरी कैद
रात्री दुकान बंद करताना सोन्याच्या मालाची तपासणी केली असता कंठी गायब असल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही महिला कंठी चोरताना दिसून आल्या. याप्रकरणी सिडको पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर करीत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Antarctica Glacier Melting : नासाच्या उपग्रह छायाचित्रांत दिसली कवटीसारखी रचना
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.