रुग्णांच्या कुटुंबीयांना प्रचंड मोठा आर्थिक दिलासा
नवी दिल्ली :Cancer Medicine Price Cut केंद्र सरकारने नफ्यावर (ट्रेड मार्जिन) मर्यादा घातल्याने, सोमवार, ९ नोव्हेंबरपासून विविध कंपन्यांच्या १३७ कर्करोगविरोधी औषधांच्या किमतीत मोठी कपात होणार आहे. यामुळे ग्राहकांची वार्षिक सुमारे ३,५०२.३१ कोटी रुपयांची बचत होईल. उदाहरणादाखल ल्युपिन लिमिटेडच्या स्तनाच्या कर्करोगावरील ‘ल्युपिहर-२’ (पर्टुझुमॅब ४२० मिग्रॅ) या इंजेक्शनची एमआरपी आता ८३,५२० रुपयांवरून ३७,३५८.३० रुपये झाली आहे.
किरकोळ विक्रेते, वितरक आणि रुग्णालयांनी सुधारित किमतींची यादी त्यांच्या आवारात आणि वेबसाइटवर ठळकपणे प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. ग्राहक एनपीपीए पोर्टल किंवा ‘फार्मा सही दाम’ ॲपद्वारे किमती तपासू शकतात आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित हेल्पलाइन क्रमांकांवर तक्रार नोंदवू शकतात.
रसायने आणि खते मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणा (एनपीपीए)ने कर्करोगविरोधी १३७ औषधांच्या व्यापारी मार्जिनवर मर्यादा निश्चित केली आहे. आरोग्य महासंचालनालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने १७ ऑक्टोबर रोजी केलेल्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
१,०३१ प्रकारांच्या किमतीत कपात
आतापर्यंत ७६ औषध कंपन्यांनी १२१ औषध घटकांशी संबंधित १,२२५ प्रकारांच्या औषधांसाठी (फॉर्म्युलेशन्स) सुधारित कमाल किरकोळ किमती (एमआरपी) सादर केल्या आहेत. १,०३१ प्रकारांच्या किमतीत कपात झाली असून, ६०० ब्रँड्सच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. यामध्ये सर्वाधिक कपात ९६.४५ टक्क्यांपर्यंत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
भारतात अद्याप सादर न झालेली, परंतु निश्चित केलेली सुमारे १०-१५ औषधेही बाजारात आल्यानंतर ‘ट्रेड मार्जिन रॅशनलायझेशन’च्या कक्षेत येतील. या सुधारणांमुळे कर्करोगावरील अनेक महत्त्वाच्या उपचारांच्या किमतीत मोठी घट झाली आहे.
उदाहरणादाखल आणखी काही औषधे…
- ‘आरपीजी लाईफ सायन्सेस’च्या ‘पालबोप्रो’ या स्तन कर्करोगावरील कॅप्सूलची किंमत ४०,४२१.३३ रुपयांवरून २,७२० रुपयांवर.
- ‘अरविनकेअर फार्मा’च्या ‘अबिरोन’ या प्रोस्टेट कर्करोगावरील गोळीची किंमत ४१,२५० रुपयांवरून ३,२१८.२३ रुपये.
- झायडस लाईफ सायन्सेसच्या फुफ्फुसाच्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील ‘ब्रिक्सटा’ (बेवासिझुमॅब १०० मिग्रॅ) या इंजेक्शनची किंमत २५,९९५ रुपयांवरून ३,३१८ रुपये.
- रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या ‘डेनऑस्टिओरेल’ (डेनोसुमाब ६० मिग्रॅ) या इंजेक्शनची किंमत २४,९५५ रुपयांवरून ६,२४० रुपयांवर.
महत्त्वाचे मुद्दे
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.