Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Farmers Diwali 2026 सुबत्तेच्या लामणदिव्यात न्हाऊ दे, माय वसुंधरा!

यंदाची दिवाळी म्हणजे ‘कहीं दीप जले, कहीं दिल’

Maharashtra Farmers Diwali 2026 भादा (लातूर) : भारतीय संस्कृतीत शतकानुशतके जपली गेलेली दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, मांगल्य आणि प्रकाशाचा उत्सव! अंधाराकडून प्रकाशाकडे, निराशेकडून आशेकडे आणि दु:खाकडून सुखाकडे घेऊन जाणारा हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करतो. मात्र, यंदाच्या दिवाळीवर अवर्षणाचे सावट पसरले असून शहरी भागात दिव्यांची रोषणाई आणि आतषबाजीचा झगमगाट दिसत असला, तरी कृषी संस्कृतीचा आत्मा असलेल्या ग्रामीण भागात मात्र निराशेचे मळभ दाटून आले आहे.

यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी अत्यंत निराशाजनक ठरला. पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके करपून गेली. बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी केलेला खर्चही पदरात पडला नाही. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आनंदाचा आणि समृद्धीचा संदेश देणारी दिवाळी यंदा अनेक शेतकरी कुटुंबांसाठी चिंतेची आणि विवंचनेची ठरली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांतून शेतकऱ्यांच्या कष्टाचे आणि भूमीशी असलेल्या त्याच्या नात्याचे महत्त्व अधोरेखित होते. शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर भारतीय समाजव्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे. मातीशी नाळ जोडून, घामाचे मोती जमिनीत पेरून संपूर्ण जगाचे पोट भरणारा हा भूमिपुत्र मात्र आज निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल झाला आहे.

एरवी खरीप हंगामातील उत्पन्नाच्या बळावर सहकुटुंब आनंदाने दिवाळी साजरी करणारा शेतकरी यंदा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. दिवाळीच्या फराळाचा गोडवा, नव्या कपड्यांचा आनंद, घरातील रोषणाई आणि सणासुदीचा उत्साह यावर आर्थिक विवंचनेची सावली पडली आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने रब्बी हंगामाच्या तयारीलाही खीळ बसली आहे. पेरणीसाठी पाण्याची उपलब्धता, बियाण्यांची व्यवस्था आणि आर्थिक तरतूद या प्रश्नांनी शेतकऱ्यांसमोर नवे आव्हान उभे केले आहे. ‘माझी शेती ही पंढरी, रखुमा माझी पेरणी करी’ या भावनेतून शेतीशी इमान राखणारा शेतकरी आजही आशेचा धागा सोडायला तयार नाही. काळ्या आईच्या कुशीत बीज पेरताना त्याच्या डोळ्यांत उद्याच्या समृद्धीची स्वप्ने असतात. मात्र, यंदा दुष्काळरूपी असुराने त्याच्या स्वप्नांवर घाला घातला आहे. परिणामी, दीपोत्सवाच्या या मंगल पर्वात कुठे दिव्यांची आरास उजळली आहे, तर कुठे शेतकऱ्यांच्या मनातील वेदनांचे अंधार दाटले आहेत. खऱ्या अर्थाने यंदाची दिवाळी म्हणजे ‘कहीं दीप जले, कहीं दिल’ अशी विषण्ण अनुभूती देणारी ठरली आहे.

तरीही या साऱ्या संकटांमध्ये शेतकऱ्यांची जिद्द आणि जगण्याची उमेद संपलेली नाही. कारण त्याला निसर्गाच्या चक्राची जाणीव आहे. आज दुष्काळ आहे, उद्या पाऊस येईल; आज पदरात निराशा आहे, उद्या समृद्धीचे दिवसही येतील, असा विश्वास त्यांच्या मनात कायम आहे. संकट कितीही मोठे असले तरी मातीतून पुन्हा उभे राहण्याची ताकद त्याच्यात आहे.दिवाळीच्या निमित्ताने घराघरांत लक्ष्मीपूजन होईल, आकाशकंदील उजळतील, पण या देशाच्या खऱ्या अन्नदात्याच्या घरातही सुख-समृद्धीचा दिवा तेव्हाच उजळेल, जेंव्हा त्यांच्या शेतात हिरवीगार पिके डोलतील, विहिरींना पाणी येईल आणि कष्टाला योग्य मोबदला मिळेल.

आज या दीपोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनात एकच भावना जागी व्हायला हवी. शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची, त्याच्या पाठीशी उभे राहण्याची आणि शेतीला पुन्हा सुबत्तेचे दिवस मिळवून देण्याची! शेवटी, या काळ्याकुट्ट परिस्थितीतही आशेचा दिवा तेवत ठेवणारा शेतकरी मनोमन निसर्गमातेला साकडे घालतो आहे. ‘हे माय वसुंधरे, पुन्हा एकदा हिरवागार शालू पांघर. शेतशिवारात समृद्धीचे पीक डोलू दे. शेतकऱ्यांच्या घामाला सोन्याचे मोल मिळू दे आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाची दिवाळी सुखासमाधानाने उजळू दे.

‘दीप’ + ‘आवली’ = दीपावली

दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. ‘दीप’ म्हणजे ‘दिवा’ आणि ‘आवली’ म्हणजेच ‘ओळ’. याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्यावेळी प्रजेने दीपोत्सव केला. अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. विविध रंगांचा आणि दिव्यांचा सण म्हणून दिवाळी म्हणजेच दीपावली साजरी करण्यामागे शास्त्र आहे.

लामण दिवा म्हणजे काय ?

लामण दिवा (किंवा लामंदिपा) हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा हँगिंग ब्रास दिवा (पितळेचा लटकता दिवा) आहे. तामिळनाडूच्या ‘थूकु विलाकू’ सारखाच हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक प्रकार मानला जातो.सामान्यत: या दिव्याला वरून लटकवण्यासाठी एक मजबूत पितळेची साखळी असते. या दिव्याला सहसा ७ वाती (किंवा ७ मुखे) असतात, ज्यामध्ये एकाच वेळी दिवे प्रज्वलित केले जातात.

Read About : Antarctica Glacier Melting : नासाच्या उपग्रह छायाचित्रांत दिसली कवटीसारखी रचना
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.