Ad Advertisement Ad Advertisement

Shahaganj Pipe Fire – शहागंजमध्ये पाणी योजनेचे पाइप जळून खाक

४५-५० लाख रुपयांचे नुकसान : जिवितहानी नाही

छत्रपती संभाजीनगर : Shahaganj Pipe Fire : शहरात खाजगी कंत्राटदारामार्फत नवीन पाणी योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असून, या कामासाठी लागणारे सुमारे २००-२५० एचडीपीई (हाय डेनसिटी पॉलिथिलीन) पाइप शहागंज येथील जुन्या बसस्थानकात आणून ठेवलेले होते. रविवारी (दि.८) दुपारी २:४० वाजता या पाइपला अचानक आग लागली. प्लास्टिकचे पाइप असल्याने ते अवघ्या काही मिनिटातच पेटले, धुराचे लोट आकाशात उंच गेले, ते पाहून शहरात मोठी आग लागल्याची चर्चा पसरली. त्यामुळे नागरिकांची एकच गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुमारे ४५-५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बसस्थानक बंद असून मोकळ्या जागेत ही घटना घडल्याने जिवितहानी झाली नाही.

शहागंज हा जुन्या शहरातील कायम गजबजलेला परिसर आहे. या भागात शहर बससेवेसाठी बसस्थानक होते, गेल्या अनेक वर्षापासून ते बंद पडलेले आहे. या जागेला पत्रे ठोकून प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. शहागंज परिसरातील वसाहतींमध्ये नवीन योजनेअंतर्गत पाणी योजनेसाठी वितरण पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे प्लास्टिकचे एचडीपी पाइप कंत्राटदाराने शहागंजच्या बसस्थानक जागेत आणून ठेवलेले होते. दिवाळी व रविवारमुळे योजनेचे काम बंद होते. दुपारी अचानक आग लागली, आगीमुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट आकाशात उठले. ते पाहून अनेकांनी शहागंजकडे धाव घेतली.

घटनेची माहिती अफरोज खान यांनी अग्निशमन विभागाला दिली, पद्मपुरा तसेच एन ९ आणि सिडको अग्निशमन केंद्राचे बंब शहागंजमध्ये धडकले. अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी दिपराज गंगावणे, मो. मुजफ्फर, प्रसाद शिंदे, अजिंक्य भगत, संपत निकाळजे, वाहन चालक एन.आर.घुगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले.

वर्षभरातील ही तिसरी घटना

शहागंजमधील जुन्या बसस्थानकाच्या जागेत रविवारी लागलेल्या आगीची ही तिसरी घटना आहे, यापूर्वी दोनदा आग लागली आहे. बसस्थानक बंद झाल्यापासून ही जागा विनावापर पडून आहे. या जागेत हातगाड्या लावून व्यवसाय करू देण्याची मागणी सातत्याने होत आहे. यातून महापालिकेला महसूल मिळेल, हातगाड्यांवरील फळ, भाजीपाला विक्रेत्यांना जागा मिळेल. शहागंजमधील वाहतूक कोंडीचाही प्रश्न सुटेल., अशी मागणी नगरसेवक फिरोज खान, अफरोज खान यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

आगीत लाखो रुपयांचे पाइप जळून खाक

घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात आम्ही शहागंजमध्ये पोहोचले. धूर पाहून आग मोठी दिसत असल्याने, सिडको व एन ९ केंद्राच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. घटनास्थळी तीन बंब पोहोचले होते. शहागंजमधील जुन्या बसस्थानकाच्या जागेतील पाइपला आग लागली होती. ती आम्ही विझविली. सध्या दिवाळी आहे, कुणीतरी फोडलेल्या फटका उडून याठिकाणी पडला असेल, किंवा रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या एखाद्याने बिडी-काडी फेकली असेल, त्यामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. आगीत पाइप जळाले आहेत, इतर कोणतेही नुकसान नाही.: दिपराज गंगावणे, अग्निशमन अधिकारी.

Read About : Venugopal Dhoot Declared Bankrupt- व्हिडीओकॉनचे माजी प्रवर्तक वेणुगोपाल धूत दिवाळखोर

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.