Ad Advertisement Ad Advertisement

Haribhau Bagde on drought-hit farmers – आईच्या मायेने दुष्काळग्रस्तांची सेवा करा

राज्यपाल बागडे यांचे लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना आवाहन : दै.’पुण्यनगरी’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

छत्रपती संभाजीनगर : Haribhau Bagde on drought-hit farmers सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतकरी, शेतमजूर व भूमिहिनांची आईच्या वात्सल्याप्रमाणे सेवा करण्याची गरज असल्याची भावना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी (दि.७) येथे व्यक्त केली. दैनिक ‘पुण्यनगरी’ मराठवाडा आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना बागडे यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांना संदेश दिला.

ते म्हणाले, १९७२ च्या भीषण दुष्काळात सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत केली नव्हती. मात्र, गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होती. रस्त्यांसाठी खडी फोडणे, मातीकाम करणे, अशा कामांसाठी अख्खे गाव लोटत असे. जो शेतकरी जमीन देईल, त्याच्या शेतात विहीर खोदण्याची कामे रोहयोतून करण्यात आली. रोहयो मजुरीच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या हाती मोठ्या प्रमाणात पैसा आला होता. त्यामुळे दुष्काळी स्थितीतही त्या वेळची दिवाळी तुलनेने चांगली झाल्याचे व्यापारी सांगतात.

सद्य:स्थितीत मातीकाम, खडी फोडणे अशी कामे करण्याची लोकांची मानसिकता राहिलेली नाही. सरकार सर्वांना मोफत धान्य देत आहे. लाडकी बहीण, शेतकरी सन्मान योजना, निराधार व वृद्धापकाळ योजना यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी दरमहा किमान २ ते ४ हजार रुपये येतात. त्यातून त्यांचा बाजारहाट चालतो. १९७२ च्या दुष्काळात अन्नाची उपलब्धता नव्हती. ती परिस्थिती आता राहिली नाही. यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे. त्यावर टँकरने पाणीपुरवठा करून मात करण्याचे प्रयत्न राज्य सरकार करेल. याशिवाय समाजातील दानशूर मंडळीही मदत करतील, असा विश्वास राज्यपाल बागडे यांनी व्यक्त केला.

सरकारी कामे तातडीने व्हावीत

दुष्काळाच्या संकटात सरकार दरबारी येणाऱ्या शेतकऱ्यांची कामे तातडीने व्हावीत. कामास विलंब होणार असेल तर त्यांना समजावून सांगावे. मात्र, चकरा मारायची वेळ त्यांच्यावर येता कामा नये. लोकप्रतिनिधींसह सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, भूमिहिनांची आईच्या वात्सल्याने कामे करावीत, अशी भावना राज्यपाल बागडे यांनी व्यक्त केली.

पाण्याची साठवणूक व्हावी

दुष्काळी स्थितीत नदी, नाल्यांच्या खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. हा चांगला निर्णय आहे. नदी, नाल्यांच्या खोलीकरणाच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याची साठवणूक करणे गरजेचे आहे. देवगिरी बँक व काही खासगी उद्योगांच्या मदतीने २०१२ या वर्षी फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अनेक नदी, नाल्यांचे खोलीकरण व गाळ काढण्याची कामे करण्यात आली होती. या कामांचे चांगले परिणाम दिसून आले. तशीच कामे यंदा व्हावीत, लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, असे राज्यपाल बागडे यांनी सांगितले.

Read About : MPSC Group C Recruitment 2026 – एमपीएससीचा मेगा दिलासा; गट-क परीक्षेची पदसंख्या आता १६ हजार ७१७ वर!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.