पुतणीच्या ससाण्यांवरील प्रेमासाठी काकांनी मोजले कोट्यवधी, १५ लाख दिरहमची विक्रमी बोली
Rare White Falcon : अबूधाबी : ससाण्यांबद्दल असलेल्या पुतणीच्या प्रेमापोटी तिच्या काकांनी तिच्यासाठी तब्बल ३.८५ कोटी रुपये मोजत दुर्मीळ पांढरा ससाणा खरेदी केला. अबूधाबी आंतरराष्ट्रीय शिकार आणि अश्वारोहण प्रदर्शनात झालेल्या लिलावात या ससाण्याला तब्बल १५ लाख दिरहम (सुमारे ३.८५ कोटी रुपये) किंमत मिळाली.
शैखा अल मन्सुरी ही तिच्या काकांसोबत या प्रदर्शनात सहभागी झाली होती. या प्रदर्शनात ससाण्यांची पैदास, प्रशिक्षण आणि संवर्धन करणारे देश-विदेशातील तज्ज्ञ सहभागी होतात. याच प्रदर्शनात उच्च किमतीचे ससाणे लिलावासाठीही ठेवले जातात.
लिलावाच्या पाचव्या फेरीत अमेरिकेतील मार्क मोग्लिच फाल्कन फार्म यांच्या मालकीचा ‘अल्ट्रा व्हाइट प्युअर गिर गारमूशा’ ससाण्याचे पिल्लू विक्रीसाठी आले. त्याच्या पूर्णपणे पांढऱ्या पिसांमुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण शरीरयष्टीमुळे त्याला मोठी मागणी होती.
प्रदर्शनातील सर्वात महागडा ससाणा
या ससाण्याचे वजन सुमारे एक किलो असून त्याची लांबी आणि रुंदी प्रत्येकी अंदाजे १६.५ इंच आहे. विक्रमी १५ लाख दिरहमच्या बोलीमुळे तो यंदाच्या प्रदर्शनातील सर्वात महागडा विकला गेलेला ससाणा ठरला आहे. यंदाच्या प्रदर्शनात ससाण्यांची पैदास व देखभाल करणारे ५५ प्रमुख स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय फार्म सहभागी झाले आहेत.
