आवाज थांबव डीजे…

आवाज थांबव डीजे… आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीकडे नेला पाहिजे.. त्या दृष्टीने काय करता येईल हे पाहिलं पाहिजे…, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे म्हणत असतानाच पुण्यात गणेशोत्सवाच्या काळातील नकोसा डीजेचा कर्णकटू दणदणाटाचा विषय ऐरणीवर आणणाऱ्या विद्यानंद बापट यांना टिळक रोड परिसरात झालेली मारहाण निषेधार्ह आहे आणि त्याच वेळी फडणवीस यांच्या नागपुरात पोलीस आयुक्त विश्वास पाटील यांनी १ नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदी लागू केली आहे. म्हणजे एकाच राज्यात, एकाच दिवशी दोन चित्रे. नागपुरात पोलीस म्हणतात – डीजे हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, त्याला बंदीच आणि पुण्यात बापटांनी तोच आग्रह धरला तर त्यांच्या थोबाडीत मारली जाते. खरे तर हा विरोधाभास नाही, ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीची शोकांतिका आहे. जो न्याय नागपुरात, जो कायद्याचा धाक नागपुरात तोच पुण्यात का नाही? मुंबईत का नाही? राज्यात इतर शहरांमध्ये का नाही? ही उत्सवी गोंगाटाची इतरांवर सक्ती की लहान थोर कुणाच्याही शारीरिक, मानसिक स्वास्थ्याची पत्रास न बाळगणाऱ्या असहिष्णुतेचा गजर असा प्रश्न विचारण्याची गरज तरी का पडावी? ध्वनी प्रदूषणाचा कायदा, मर्यादित डेसिबलच्या साऊंडला मान्यता ही सारी नियमावली ठरवून दिली असताना अंमलबजावणी यंत्रणा या नियमावलीला पायदळी तुडवण्याचे स्वातंत्र्य देत असतात, तेव्हा हा फक्त शरीर स्वास्थ्याचा प्रश्न न राहता समाज स्वास्थ्याचाही प्रश्न बनतो.
उत्सव म्हटला की आवाज आलाच असे या साऊंडच्या समर्थनार्थ सांगितले जाते. पण, जेव्हा हाच आवाज कर्णकर्कश उच्छाद होतो, डीजे स्पीकरच्या भिंती घराच्या भिंती, खिडक्या, काचा हादरवतात, ज्येष्ठांच्या हृदयाची धडधड वाढवतात, रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याची हानी करतात, लहान बाळांना रडवतात, प्राण्यांना घाबरवतात, सर्वसामान्यांना जीव नकोसा करतात तेव्हा तो उत्सव उरत नाही, तो काही मूठभरांनी इतरांवर केलेला अत्याचार बनतो. सांस्कृतिक राजधानी म्हणवले जाणारे पुणे आज गुन्हेगारीमुळे, कोयता गँगमुळे बदनाम झाले आहे. सूज्ञ, शांतताप्रिय पुणेकरांचा आवाज दडपला जात आहे. याच दडपशाहीचे प्रत्यंतर बापटांना भररस्त्यात कानशिलात लगावण्यातून आले. ही घटना घडल्यावर अर्थातच त्याचे राजकीय पडसादही उमटले आहेत. विरोधकांनी राजकारणासाठी या घटनेचा उपयोग करणे हे काही नवीन नाही. या राजकारणापलीकडे जाऊन या मुद्द्याकडे पाहिले पाहिजे. समाजाभिमुख पत्रकारिता करताना ‘दै. पुण्यनगरी’ने नेहमीच सर्वसामान्यांच्या भावना, मतांना स्थान दिले आहे. डीजे साऊंड मर्यादा पाळून, लक्षवेधी देखावे, सजावट, नेत्रदीपक रोषणाई या प्रकारेही गणेशोत्सव साजरा करता येतो हे सर्वसामान्य पुणेकराचे मत आहे. पुण्यातील बहुतेक गणेशोत्सव मंडळे याच प्रकारे गणरायांचे स्वागत करत असतात. कायद्याच्या मर्यादांचे पालन करून, ध्वनी प्रदूषणात भर पडणार नाही अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा व्हावा याला कुणाचीही हरकत नसावी. मत आणि मतभेद व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. बापट त्यांचे मत मांडत होते. ते पटत नसलेल्या कुणीही त्यांचा शाब्दिक प्रतिवाद करू शकतो. मात्र, संतोष चव्हाण याने कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांना लगावलेली थप्पड ही कायद्याच्या राज्यावरची थप्पड आहे असेच म्हणावे लागेल.
कानठळ्या बसवणाऱ्या डीजे साऊंडमुळे होणाऱ्या हानीचा तपशील सुजाण नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवणारा आहे. १२० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचा गोंगाट करणाऱ्या स्पीकर ‘भिंती’ या मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत आणि त्या ड्रग्सच्या अमलाखालील व्यक्तींमध्ये हिंसक वर्तनाला उत्तेजन देतात. प्रसंगी कमकुवत हृदयाच्या व्यक्तीचा मृत्यूही ओढवतो, हे दुष्परिणाम नोंदवले गेले आहेत. अशा दुर्दैवी घटनांच्या बातम्या प्रसिद्ध होतात, पण कालांतराने विस्मृतीत जातात. सर्वोच्च न्यायालयाने आणि ध्वनी प्रदूषण नियम २००० ने निवासी भागात दिवसा ध्वनी मर्यादा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल ठेवली आहे. डीजे साऊंड जवळपास १२० ते १३० डेसिबलपर्यंत असतो. म्हणजे जेट इंजिनच्या आवाजाएवढा. अशा आवाजाच्या स्पीकर भिंतीजवळ १५ मिनिटे उभे राहिले तरी कायमचे बहिरेपण येऊ शकते. हृदयविकार, उच्च रक्तदाब, अनिद्रा हे जोडीला आहेच. लहान मुलांमध्ये यामुळे भीती, चिडचिड, अभ्यासात लक्ष न लागणे अशी लक्षणे दिसतात. गरोदर महिलांना सर्वाधिक त्रास जाणवतो. ‘कोणालाही आपला उत्सव साजरा करण्यासाठी दुसऱ्याच्या शांततेचा भंग करण्याचा अधिकार नाही. रात्री १० ते सकाळी ६ हा कालावधी सायलेन्स झोन आहे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने २००५ च्या निकालातच म्हटले होते.
विद्यानंद बापट गणेशोत्सव, धर्माबद्दल आक्षेपार्ह बोलले यासाठी ही हिंसक प्रतिक्रिया उमटली असे काही जणांना वाटत असेलही. पण, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो लोकजागृतीसाठी, अशा पुंडाईसाठी नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. सोलापूरने तर संपूर्ण शहर डीजे-मुक्त केले आहे. अशा वेळी डीजे आवाज किती असावा याचा पुण्यातील गणेश मंडळांनीही विचार करायला हवा. इच्छाशक्ती आणि स्वयंनियमन यांच्या अवलंबातून हे घडून येऊ शकते. पुणे पोलीस आय़ुक्तांनी गणेशोत्सव काळात चार बेस चार टॉप अशाच साऊंडला परवानगी असेल असे आता जाहीर केले आहे. प्रत्येकाला मत स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कुणी आपले मत मांडत असताना असे करणे योग्य नाही, हे या प्रकरणातील मुख्यमंत्र्यांचे म्हणणे महत्त्वाचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नागरिकांना कुठलाही त्रास, गैरसोय होऊ नये अशीच आमची भूमिका आहे असे स्पष्ट केले आहे. काही गणेशोत्सव मंडळांनी बापट यांना झालेल्या मारहाणीचा निषेध केला आहे हे स्वागतार्ह आहे. यातून सर्वसामान्यांच्या हिताचे असे काही सकारात्मक घडून यावे हीच गणरायांच्या चरणी प्रार्थना!