दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फळबागा वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दिलासा
मुंबई : Maharashtra borewell ban relaxed till December 15 यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फळबागा वाचवण्यासाठी बोअरवेल (विंधन विहीर) खोदकाम आणि खोलीकरणावरील बंदी १५ डिसेंबरपर्यंत तात्पुरती शिथिल करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ही बंदी सरसकट आणि सर्वत्र उठवण्यात आलेली नाही; जिथे प्रत्यक्ष फळबागा आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे, तिथेच ही परवानगी लागू राहील. ज्या ठिकाणी फळबागा नाहीत किंवा इतर शेतीसाठी बोअरवेल घ्यायची आहे, तिथली बंदी कायमस्वरूपी लागू राहील. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सावंगी लोहारा येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला.
नागपूर येथील लोहारी सावंगा येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला. त्या वेळी आलेल्या मागण्या लक्षात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जी गावे मदत करतील, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. सरपंचांनी मांडलेल्या सर्व सूचना व जलसंधारणाच्या प्रश्नासंदर्भात प्राधान्याने कामे सुरू करण्यात येईल. अटल भूजल योजनेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत तसेच नादुरुस्त कामांना दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा, अशा सूचना देतानाच, दुष्काळाचा सामना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी कुटुंबासमवेत दिवाळी साजरी
दुष्काळामुळे हवालदिल शेतकऱ्यांना मानसिक बळ, आत्मविश्वास देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदा शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकरी कुटुंबात मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर तर्री पोह्याचा नास्ता घेतला. तुमच्यासोबत दिवस आनंदात गेला. छान झोप लागली, अशी कृतज्ञता मुख्यमंत्र्यांनी शेतकरी रामभाऊ बालपांडे यांचे घर सोडताना व्यक्त केली. नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. गावातच रामभाऊ बालपांडे यांच्या घरी शनिवारी रात्री त्यांनी भोजन घेतले. गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर बालपांडे कुटुंबीयांशी गप्पा करत मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबातच अभ्यंगस्नान केले. अरुणाताईंनी भाऊबीज केली. घरातील सर्व महिलांनी पारंपरिक पद्धतीने ओवाळणी आणि औक्षण केले. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बहिणीच्या तबकात ओवाळणी घातली.
लाडक्या बहिणींना आनंद
आजवर एकाही मुख्यमंत्र्याला आम्ही प्रत्यक्ष पाहिले नव्हते. मात्र, आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या गावात मुक्काम करून आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला, अशी भावना लोहारी सावंगा येथील महिलांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आपल्या छोट्याशा गावात आले आणि रात्रभर येथेच थांबले याचा झालेला आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आज खऱ्या अर्थाने आम्ही दिवाळी साजरी केली. फडणवीस आज आमच्या कुटुंबाचा भाग झाले. त्यामुळे हा क्षण आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या पाठीशी देवाभाऊ नेहमीच उभे राहिले आहेत. त्यांनी दिवाळीत आमच्या गावात मुक्काम करणे ही आमच्यासाठी सर्वात मोठी भाऊबीज भेट असल्याचेही या महिलांनी सांगितले.
बांधावर जात पिकांची पाहणी
पावसाअभावी शेतातील कापूस व तुरीची झाडे सुकत असून, अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने आवश्यक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी कळमेश्वर तालुक्याच्या कोहळी गावातील बाबुराव काळे या शेतकऱ्याला दिली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी व त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांनी लोहारी सावंगा या गावात मुक्काम केला होता. त्यानंतर रविवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन सोबत असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
महत्वाचे मुद्दे
Read About : Maharashtra farmers Diwali relief- सरकारची दिवाळी बळीराजाच्या दारात
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.