Ad Advertisement Ad Advertisement

Cyberbullying among students worldwide – जगभरातील दहापैकी 1 विद्यार्थ्याला सायबर बुलिंगचा फटका

एआयमुळे वाढले ऑनलाइन छळाचे नवे धोके, यूनेस्कोचा इशारा

नवी दिल्ली : Cyberbullying among students worldwide जगभरातील दर तीन विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या छळाचा सामना करावा लागत आहे, तर दहापैकी एका विद्यार्थ्याला सायबर बुलिंगचा फटका बसत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात यूनेस्कोने ही आकडेवारी जाहीर करताना कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) विद्यार्थ्यांसमोरील ऑनलाइन छळाचे नवे धोके वाढत असल्याचा इशारा दिला आहे.

यूनेस्कोने ‘कनेक्ट अँड सेफ’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या नव्या धोरणात्मक अहवालात शाळांमधील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्याचे नमूद केले आहे. एआयच्या मदतीने अश्लील स्वरूपातील बनावट छायाचित्रे तयार करणारे अॅप्स, आवाजाची हुबेहूब नक्कल करणारे व्हॉइस क्लोनिंग तंत्रज्ञान, स्वयंचलित ऑनलाइन छळ आणि मुलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरले जाणारे एआय आधारित संवाद अ­ॅप्स यांसारखे प्रकार विविध देशांमधील शालेय घटनांमध्ये समोर येत आहेत.

यूनेस्कोचे महासंचालक खालिद अल-एनानी यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. जगभरातील लाखो मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य धोक्यात आले असून, या समस्येचे परिणाम केवळ वर्गखोलीपुरते मर्यादित राहत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०१८ ते २०२२ या कालावधीत युरोप, मध्य आशिया आणि उत्तर अमेरिकेतील ४४ देशांमध्ये सायबर बुलिंगचे प्रमाण १२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुली, दिव्यांग मुले आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना छळाचा अधिक आणि गंभीर त्रास सहन करावा लागतो. छळाच्या स्वरूपाचा विचार केल्यास, मुले आणि मुली दोघांनाही याचा समान फटका बसतो. परंतु त्याचे स्वरूप वेगवेगळे असते. मुलांमध्ये प्रामुख्याने शारीरिक हिंसा आणि मारहाण जास्त दिसते, तर मुलींना सायबर बुलिंग आणि शारीरिक स्वरूपावरून केल्या जाणाऱ्या मानसिक छळाला सामोरे जावे लागते. मात्र लैंगिक अत्याचार, छेडछाड आणि बलात्कार यांसारख्या शारीरिक हिंसाचाराच्या घटनांना मुली अधिक प्रमाणात बळी पडतात, असे अहवालात नमूद केले आहे.

सामूहिक प्रयत्नांची गरज

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केवळ शाळांनी प्रयत्न करून चालणार नाही, तर सरकार, तंत्रज्ञान कंपन्या, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि नियामक संस्थांनीही सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याची गरज यूनेस्कोने व्यक्त केली आहे. शिक्षकांना डिजिटल सुरक्षेचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक मदत, तक्रार नोंदविण्याची प्रभावी व्यवस्था आणि ऑनलाइन सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये सातत्याने गुंतवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, एआयच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर तरुणांकरिता सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्यासाठी युनेस्को लवकरच जागतिक मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे.

Read About : No Age Limit for Law Admissions – विधि अभ्यासक्रमांसाठीची वयोमर्यादा रद्द
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.