कर्करोगाच्या पेशींमधील कार्बन मोनॉक्साइडचा वापर करून त्यांच्याच आत औषध तयार करण्याची पद्धत विकसित; निरोगी पेशींना वाचवण्याची आशा
नवी दिल्ली : Cancer Cell Targeted Drug Delivery कर्करोगावरील उपचारांमध्ये निरोगी पेशींना होणारे नुकसान कमी करण्यासाठी जपानमधील संशोधकांनी एक अभिनव प्रयोग केला आहे. कर्करोगाच्या पेशी स्वत: तयार करत असलेल्या कार्बन मोनॉक्साइड वायूचा वापर करून त्यांच्याच आत कर्करोगविरोधी औषध तयार करण्याची पद्धत विकसित करण्यात आली आहे. या संशोधनामुळे भविष्यात अधिक लक्ष्यित उपचारांचा मार्ग खुला होऊ शकतो.
जपानमधील रिकेन पायोनियरिंग रिसर्च इन्स्टट्यिूटचे कात्सुनोरी तनाका यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले. ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अनेक प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण तुलनेने जास्त असते. संशोधकांनी याच वैशिष्ट्याचा उपयोग औषध तयार करण्यासाठी केला. Cancer Cell Targeted Drug Delivery
यासाठी पॅलेडासायकल नावाच्या धातूयुक्त संयुगाचा वापर करण्यात आला. मात्र, पेशींमधील ग्लुटाथायोनमुळे या संयुगातील पॅलेडियम निष्क्रिय होण्याची अडचण होती. त्यावर उपाय म्हणून संशोधकांनी हे संयुग अल्ब्युमिन या प्रथिनाच्या आवरणात सुरक्षित ठेवले. त्यामुळे ते पेशींपर्यंत पोहोचू शकले. Cancer Cell Targeted Drug Delivery
४८ तासांच्या प्रयोगात महत्त्वाचे निष्कर्ष
संशोधकांनी यकृत, गर्भाशयमुख, स्तन आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या मानवी पेशींवर प्रयोग केला. ४८ तासांनंतर या पेशींमध्ये फेनॅन्थ्रिडिनोन नावाचे संयुग तयार झाल्याचे आढळले. मात्र, सामान्य पेशींमध्ये ते आढळले नाही. पुढील बदलांनंतर यकृताच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये विषारी कर्करोगविरोधी संयुग तयार झाले आणि त्या पेशींचे नुकसान झाल्याचे दिसून आले.
उपचारपद्धतीत बदलाची शक्यता
रक्तातील कार्बन मोनॉक्साइड हिमोग्लोबिनला जोडलेला असल्याने त्याचा वापर औषधनिर्मितीच्या प्रक्रियेत होत नसल्याचे प्रयोगशाळेतील चाचण्यांत दिसले. त्यामुळे रक्तातच औषध तयार होण्याचा धोका कमी असू शकतो. मात्र, हे संशोधन सध्या प्रयोगशाळेतील पेशींपुरते मर्यादित आहे. आता प्राण्यांवर चाचण्या करण्याची संशोधकांची योजना आहे. मानवी उपचारांसाठी ही पद्धत सुरक्षित आणि प्रभावी ठरते का, हे पुढील संशोधनातूनच स्पष्ट होईल.
Read About : Antarctica Glacier Melting : नासाच्या उपग्रह छायाचित्रांत दिसली कवटीसारखी रचना
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.