Ad Advertisement Ad Advertisement

Lakshmi Pujan 2026 घरोघर ‘धूम’ धडाक्यात लक्ष्मीपूजन,दुष्काळातही सुमारे ४ कोटींचा ‘धूर’!

लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळला आसमंत, आतषबाजीने विविध रंगांची पखरण

छत्रपती संभाजीनगर :Lakshmi Pujan 2026 शहरासह जिल्ह्यात रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घराघरांसह बाजारपेठांतील व्यापाऱ्यांच्या फर्ममध्ये थाटामाटात पारंपरिक पद्धतीने विधिवत लक्ष्मीपूजन पार पडले. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी ६ वाजेपासून फटाक्यांच्या आतषबाजीसह लक्ष-लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून निघला. सायंकाळी ६ ते मध्यरात्रीच्या दोन असे तब्बल ८ तास शहरात फटाक्यांची ‘धूम’ सुरू होती. दुष्काळातही श्रीलक्ष्मीचे मनोभावे पूजन करून शहर आणि जिल्ह्यात सुमारे ४ ते साडेचार कोटींच्या फटाक्यांची आतषबाजी झाल्याचा प्राथमिक अंदाज फटाका विक्रेत्यांनी केला आहे.


गेल्या आठवडाभरापासून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. नवीन कपडे, खाद्यपदार्थ, फटाके व इतर साहित्यांच्या खरेदीसाठी दुकाने ग्राहकांनी फुलून गेल्याचे चित्र होते. नवी जाधववाडीसह विविध ठिकाणी व्यापाऱ्यांनी चोपड्यांचे पूजन करून श्रीलक्ष्मीपूजन केेले. यंदा दिवाळी आणि नरकचतुर्दशी एकाच दिवशी आल्याने भल्या पहाटे सुगंधी उटणे, सुवासिक तेलाने अभ्यंगस्नान करून दिवाळीला सुरुवात झाली. सायंकाळी विविध मंदिरे, बाजारपेठांत, दुकानांसमोर, घरासमोर सडा-सारवण करून अंगणात विविधांगी कलाकुसरच्या विविध रंगी रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या. त्यानंतर घराघरांत दुपारपासूनच पूजेची जय्यत तयारी सुरू झाली. उस, पाच फळे, केरसुणी, मिठाईचा नैवेद्य, पाना-फुलांची आरास, पासबुक, चेक, एटीम, रोकड आदींसह हिशोबाच्या वह्या-पेन श्रीलक्ष्मीच्या मूर्तीसमारे मांडण्यात आल्या होत्या. बाजारपेठांसह घराघरांत नवीन कपडे परिधान करून उत्साहात लक्ष्मीपूजन पार पडले.


आबालवृद्धांनी लुटला आनंद

वृषभ लग्न (स्थिर) मुहूर्तावर सायंकाळी ६.१४ ते ८.१५ या वेळात श्रीमहालक्ष्मीची यथासांग पूजा-आरतीनंतर श्रीफळ वाहून आणि लाह्या-बत्ताशांचा प्रसाद वाटूप तुफान फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात झाली. पणत्या, आकाश दिवे, विविधरंगी विद्युत रोषणाईने आसमंतात विविध रंग उधळले. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. बच्चे कंपनीसह ज्येष्ठांनीही फटाके फोडण्याचा आनंद लुटला.

ग्रामीणमध्ये दुष्काळाची छाया

गेल्या १५ दिवसांपासून शहरात दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली होती. बोनस वेळेवर हाती आल्याने शहरातील कापड बाजारात तुडुंब गर्दी दिसून आली. ग्रामीण भागात मात्र दिवाळ खरेदीवर दुष्काळाचे सावट दिसून आले. खरेदी करताना ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवीन कपड्यांसह सोने, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, भेटवस्तू, सुका मेवा, वाहने खरेदीवर नागरिकांच्या उड्या पडल्या. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी खरेदीचा आनंद लुटला.


वसुबारसपासून उत्साहाला उधाण

गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी वसुबारसपासून दिवाळी सणाला हर्षोल्हासात प्रारंभ झाला. शुक्रवारी, ६ रोजी धनत्रयोदशीपासून घराघरांत लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू होती. घरासमोर सडासंमार्जन, रांगोळ्या काढून अंगण सजविण्यात आले. आकाश कंदील, विद्युत रोषणाईने घराची शोभा वाढविण्यात आली. रविवारी सकाळपासून लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त देण्यात आले असले तरी सायंकाळी ६ वाजेनंतर लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू झाली. धर्मशास्त्राच्या आधारे प्रदोषकाळ स्थिर लग्नात पूजन करणे श्रेष्ठ मानले जाते. लक्ष्मी-गणेश-कुबेर, वाणी, वही व तिजोरीसह केरसुणीचेही पूजन करण्यात आल. घराघरांत मोठ्या थाटामाटात आणि अपूर्व उत्साहात लक्ष्मीपूजन पार पडले. बाजारपेठेत, प्रतिष्ठाने, दुकानांमध्येही हर्षोल्हासात सहकुटुंब सहपरिवार लक्ष्मीपूजन करण्यात आले.


फटाक्यांची आतषबाजी

मुख्येत्वे शहरात यावर्षी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाली. घरोघरी सुरसुऱ्या, भुईनळे, भुईचक्कर, सुतळी बॉम्ब, सेव्हन आवाज, बारा आवाज, रॉकेट, नागगोळी, रेल्वे, बेगडी बॉम्ब, लसूण फटाके, अनार आदी फटाके फोडून आबालवृद्धांनी आनंद व्यक्त केला. आकर्षक रोषणाई करणाऱ्या फटाक्यांनी आसमंत उजळून निघाला. फटाके फोडण्यासाठी बच्चेकंपनीची धावपळ सुरू होती. बाजारपेठेसह घरासमोर फुटणाऱ्या फटाक्यांचा धडाड ‘धूम’ आवाज लक्ष वेधून घेत होता. शहरात लक्ष्मीपूजनाला अडीच ते तीन कोटीं आणि ग्रामीण भागात दीड ते दोन कोटी रुपयांचे फटाके फोडण्यात आल्याचा दावा फटाक्याचे अधिकृत व्यापारी अमोल सोभावने यांनी केला आहे.


गरीबाच्या ‘लक्ष्मी’ ला भाव!

लक्ष्मीपूजन करण्यासाठी सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी लगबग सुरू होती. केळीची पाने, झेंडू-शेवंतीफुलांसह प्रसाद, उस, पाच प्रकारची फळे, नवीन कपडे, फराळ यांसह इतर साहित्यांची खरेदी सुरू होती. लाल-पिवळ्या झेंडू फुलांनी बाजार फुलला होता. झेंडूचा भाव ३० ते ४० रुपये, तर शेवंती फुलांचे भाव २०० ते २५० रुपये किला दराने विक्री झाली, अशी माहिती गांधेली येथील फुल उत्पादक कडूबा भावलाल बोंगाणे यांनी दिली. गरीबाची लक्ष्मी म्हणजे ‘केरसुणी’ चीही चढ्या भावाने मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेता लक्ष्मण जगधने यांनी सांगितले.


बाजार बहरला

सिटीचौक, सुपारी हनुमान, मछली खडक, सराफा बाजार, शहागंजी, राजाबाजार, पैठणगेट, गुलमंडी, कुंभारवाडा, रंगार गल्ली, कासारी बाजार, सिटी चौक, शहागंज, गजानन महाराज मंदिर, शिवाजीनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको, पुंडलिकनगर एवढेच नव्हे तर मिटमिटा-पडेगाव ते मुकुंदवाडी ते चिकलठाणपर्यंत दिवाळी सण ‘धूम’ धडाक्यात साजरा झाला.

Read About : Diwali Electrical Firecracker Safety – रोषणाईचा उत्साह, पण सुरक्षेचा विसर नको!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.