फटाके आणि विद्युत सजावटीत सावधानता हवी | महावितरणचा सतर्कतेचा इशारा
छत्रपती संभाजीनगर : Diwali Electrical Firecracker Safety – दिवाळीचा आनंद साजरा करताना विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत होणारी छोटीशी निष्काळजीपणाची चूक मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकते. घरगुती विद्युत सजावटीपासून सार्वजनिक विद्युत यंत्रणांपर्यंत प्रत्येक ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. विद्युत शॉक, शॉर्टसर्किट आणि आगीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
दिवाळीनिमित्त घरोघरी विद्युत दिव्यांच्या माळा, आकर्षक रोषणाई आणि आकाशकंदिलांची सजावट केली जाते. मात्र, सजावटीच्या उत्साहात विद्युत सुरक्षेकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्युत माळा लावण्यापूर्वी त्यांचा दर्जा तपासावा. वायर तुटलेली, खराब झालेली किंवा चिकटपट्टीने जोडलेली असल्यास तिचा वापर टाळावा. विद्युत माळा आणि आकाशकंदिलांच्या तारा लोखंडी जाळ्या, जिने तसेच इतर धातूंच्या वस्तूंपासून सुरक्षित अंतरावर ठेवाव्यात.
विशेष म्हणजे, अनेकदा आकाशकंदील किंवा विद्युत माळा लावण्यासाठी योग्य प्लग-सॉकेटचा वापर न करता वायर थेट प्लगमध्ये खोचण्याचा धोकादायक प्रकार केला जातो. यामुळे स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य प्लग आणि सॉकेटचाच वापर करावा. एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे जोडून अतिरिक्त विद्युत भार टाकू नये. ओल्या हातांनी स्विच किंवा प्लगला स्पर्श करू नये. घरातील अर्थिंग योग्य असल्याची खात्री करून विद्युत उपकरणांजवळ तेलाचे दिवे किंवा मेणबत्त्या लावणे टाळावे.
फटाक्यांच्या आतषबाजीतही खबरदारी आवश्यक
फटाके फोडताना सार्वजनिक विद्युत यंत्रणांना धोका निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. विद्युत वाहिन्या, रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर आणि रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत. या यंत्रणांजवळ कचरा टाकणे किंवा जाळणेही टाळावे. विद्युत वाहिन्यांना स्पर्श होण्याची शक्यता असलेले रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांच्या खाली उडवू नयेत. फटाक्यांची आतषबाजी केवळ मोकळ्या आणि सुरक्षित जागेतच करावी. विद्युत यंत्रणेला आग लागल्यास, विद्युत सुरक्षेचा धोका निर्माण झाल्यास किंवा वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांनी महावितरणच्या २४ तास सुरू असलेल्या कॉल सेंटरशी संपर्क साधावा.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Humanity Police Social Workers – नात्यांनी साथ सोडली, माणुसकीने अखेरचा प्रवास सावरला!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.