हायटेक चोरी : चोरलेल्या मोबाईलमधील सिमकार्ड अन् ओटीपी वापरून दोन बँक खाती केली रिकामी
छत्रपती संभाजीनगर : SIM Card OTP Fraud आठवडी बाजारातून मोबाईल चोरणाऱ्यांनी थेट नागरिकांच्या बँक खात्यांवर डल्ला मारण्याची नवी मोडस सुरू केली आहे. मुकुंदवाडीतील कामगार चौकात भाजीपाला खरेदी करणाऱ्या एका ६१ वर्षीय खत व्यावसायिकाच्या खिशातून आयफोन चोरून, त्यातील बँकेला लिंक्ड सिमकार्ड आणि ‘फोन पे’च्या माध्यमातून तब्बल १ लाख ४५ हजार रुपये लंपास केले. शनिवारी (दि. ७) सकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने तक्रारदाराची चांगलीच धांदल उडाली. सुरुवातीला मोबाइल हरवल्याची तक्रार दिल्यानंतर थेट बँक खाते रिकामे केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रामप्रसाद दगडूबा दांड (६१, रा. कोणीका सोसायटी, एन-४, सिडको) हे फिर्यादी आहेत. शनिवारी सकाळी ते कामगार चौकात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. भाजीचे पैसे देण्यासाठी त्यांनी शर्टाच्या वरच्या खिशात हात घातला असता, त्यांचा आयफोन गायब असल्याचे लक्षात आले. गर्दीचा फायदा घेत चोराने हातचालाखीने फोन लांबवल्याची खात्री पटताच, दांड यांनी मुकुंदवाडी ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दिली. मोबाईल चोरणाऱ्या भामट्याचा उद्देश केवळ फोन चोरणे नव्हता.
दांड यांच्या मोबाईलमधील सिमकार्ड त्यांच्या बँक खात्यांशी संलग्न (लिंक) होते. चोरट्याने फोन अथवा सिमकार्ड सुरू ठेवून बँकेचे ‘ओटीपी’ मिळवले. त्यानंतर ‘फोनपे’ ॲपद्वारे दांड यांच्या आयडीएफसी आणि येस बँकेच्या खात्यांतून एकापाठोपाठ एक व्यवहार करत १ लाख ४५ हजार रुपये स्वत:च्या खात्यात वळते करून घेतले. खाती रिकामी झाल्याचे समजताच दांड यांनी पुन्हा मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शैलेंद्र अडियाल अधिक तपास करत आहेत.
सिमकार्ड दुसऱ्या फोनमध्ये टाकण्याचा फंडा
आयफोन लॉक असला, तरी भामटे त्यातील सिमकार्ड काढून दुसऱ्या साध्या हँडसेटमध्ये टाकतात. तिथून ओटीपी मिळवून यूपीआय पिन बदलणे किंवा पैसे ट्रान्सफर करणे त्यांना सहज शक्य होते.
काय काळजी घ्यावी?
- सिमकार्ड, यूपीआय ब्लॉक करा : मोबाईल चोरीला जाताच केवळ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन थांबू नका; सर्वात आधी कस्टमर केअरला फोन करून सिमकार्ड आणि बँक खात्याचे यूपीआय तातडीने ब्लॉक करा तसेच १९३० या सायबर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवा.
- सिम लॉक ठेवा : आपल्या सिमकार्डला ‘सिम पिन’लावून ठेवा, जेणेकरून चोरांनी सिमकार्ड दुसऱ्या फोनमध्ये टाकले तरी ते अनलॉक होणार नाही.
Read About : Beed Land Mafia Gang in CSN – दीड एकर जमिनीचा 14 कोटींत सौदा करून 65 लाख उकळले
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.