रामदास कदमांकडून चौकशीची मागणी; तटकरेंनी आरोप फेटाळले
मुंबई : Ajit Pawar Plane Crash Allegations राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या राजकीय निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणातही तटकरे यांची भूमिका तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर, सुनील तटकरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. रामदास कदम यांनी माझ्यावर केलेले आरोप निराधार आणि कपोलकल्पित असून, याप्रकरणी त्यांना कायदेशीर नोटीस पाठविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
सुनील तटकरे हे कोणाचेही होऊ शकत नाहीत. माजी मुख्यमंत्री अंतुले यांचे स्वीय सहायक असताना तटकरे यांनी त्यांनाही संपवले. जो जो माणूस त्यांना जवळ करतो, त्यालाच संपवण्याचं काम तटकरे करतात, असा आरोप कदम यांनी केला. तटकरे यांच्या निवडणुकीत आपण खांद्याला खांदा लावून काम केले होते. मात्र, हा माणूस भविष्यात कोणाचाही होणार नाही, असा इशारा त्यावेळी अनेकांनी दिला होता, असेही ते म्हणाले.
तटकरे यांना स्वत:ला उपमुख्यमंत्री व्हायचे होते, असा दावा करत कदम यांनी त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवरही टीका केली. हा फार महत्त्वाकांक्षी माणूस आहे. काहीही करू शकतो, असे कदम म्हणाले.
तटकरे पाठवणार कायदेशीर नोटीस
रामदास कदम यांचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याकडून माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असून, त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. रामदास कदम विरोधी पक्षनेते होत असताना ते माझ्याकडे हातापाया पडत आले होते. त्यावेळी मी त्यांना माझ्या गाडीतून अजित पवार यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यानंतरच ते विरोधी पक्षनेते झाले. आपण सांगत असलेली ही बाब खरी की खोटी, हे कदम यांनीच स्पष्ट करावे, असे आव्हान त्यांनी दिले. कदम यांच्याकडून वारंवार निराधार आरोप केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यात अर्थ नाही. यापुढे त्यांच्या कोणत्याही विधानावर प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, ज्या प्रकरणात कायदेशीर लढा देण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे तटकरे म्हणाले.
रामदास कदमांनी जबाबदारीने बोलावे – राष्ट्रवादी
रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्याबाबत केलेले आरोप पुराव्याशिवाय आहेत. ज्येष्ठ नेत्यांनी अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये करणे योग्य नाही, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेसंदर्भात कदम यांच्याकडे काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते जाहीर करावेत. केवळ आरोप करून संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहनही पाटील यांनी केले.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Mahayuti alliance tensions in Maharashtra- महायुतीत पुन्हा धुसफूस?
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.