कधी लाल, कधी सोनेरी तर कधी जांभळ्या रंगात न्हाऊन निघतात हे डोंगर
नवी दिल्ली : Color Changing Mountains काश्मीर असो, हिमाचल असो वा स्वित्झर्लंड आपण आजवर पाहिलेले किंवा ऐकलेले डोंगर हे सहसा हिरवेगार, काळे-पांढरे किंवा बर्फाच्छादित असतात. पण तुम्हाला जर कोणी सांगितले की, या पृथ्वीवर असेही काही डोंगर आहेत जे ऋतूनुसार, वेळेनुसार आणि सूर्यप्रकाशानुसार चक्क स्वत:चा रंग बदलतात, तर? नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही. कधी लाल, कधी सोनेरी, तर कधी जांभळ्या रंगात न्हाऊन निघणारे हे डोंगर म्हणजे निसर्गाचा एक महाचमत्कार आहेत. या पृथ्वीवर प्रत्यक्षात अशा काही जागा आहेत, जिथे डोंगर एखाद्या कॅनव्हाससारखे विविध रंगांनी नटलेले दिसतात.
झँगये डॅन्क्सिया (चीन) : चीनमधील हे डोंगर सुमारे २४ दशलक्ष वर्षांच्या भूगर्भीय हालचालींतून तयार झाले आहेत. येथील वाळूचे खडक आणि खनिजांच्या थरांमुळे पर्वतांना सप्तरंगी रूप मिळाले आहे. कडक सूर्यप्रकाश आणि पावसाळ्यानंतर हवामानातील बदलांनुसार हे डोंगर वेळेनुसार चक्क स्वत:चा रंग बदलतात, ज्यामुळे ते एखाद्या जिवंत चित्रासारखे भासतात.
विनीकुंका किंवा रेंबो माउंटेन (पेरू) : पेरू देशात ५,२०0 मीटर उंचीवर असलेले हे डोंगर २०१५ पर्यंत बर्फाखाली झाकलेले होते. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळल्यावर खनिजांच्या रासायनिक प्रक्रियेतून (ऑक्सिडेशन) हे सप्तरंगी पट्टे समोर आले. येथे मातीतील लोहामुळे लाल, सल्फरमुळे पिवळा आणि इतर घटकांमुळे जांभळा-निळा रंग सूर्यप्रकाशात चमकताना दिसतो.
हॉर्नकॅलकल किंवा १४ रंगांचे डोंगर (अर्जेंटिना) : अर्जेंटिना येथील हे डोंगर चुनखडी आणि प्राचीन सागरी गाळापासून बनले आहेत. याचा आकार इंग्रजी व्ही अक्षरासारखा टोकदार आहे. सूर्यप्रकाशाच्या कोनानुसार या पर्वतावर एकाच वेळी १४ वेगवेगळ्या रंगांच्या छटा बदलताना दिसतात. दुपारच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी तर दर अर्ध्या तासाने डोंगराचे रंग बदलल्याचा भास होतो.
लँडमनलॉगर (आइसलँड) : आइसलँडमधील हे डोंगर ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघालेल्या ऱ्हिओलाईट खडकांपासून बनले आहेत. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर येथील लाव्हा रस, गंधक आणि लोहाच्या मिश्रणामुळे डोंगर गुलाबी, तपकिरी आणि चकाकत्या पिवळ्या रंगात न्हाऊन निघतात. जमिनीतून निघणारी वाफ आणि सूर्यप्रकाशामुळे या डोंगरांचे रंग सतत बदलत राहतात.
सेव्हन कलर्ड अर्थ (मॉरिशस) : हे मोठे डोंगर नसले तरी, चामारेल येथील डोंगरवजा टेकड्या ७ वेगवेगळ्या रंगांच्या मातीने बनलेल्या आहेत. विशेष म्हणजे, पावसाच्या मुसळधार पाड्यानंतरही या मातीचे वेगवेगळे रंग एकमेकांत मिसळत नाहीत. कारण: ज्वालामुखीचा लाव्हा वेगवेगळ्या तापमानाला थंड झाल्यामुळे या मातीला लाल, जांभळा, निळा आणि हिरवा रंग मिळाला आहे.
व्हेर्मिलियन क्लिफ्स (अमेरिका)वैशिष्ट्य : अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यात असलेले हे डोंगर लाल, गुलाबी, सोनेरी आणि जांभळ्या रंगाच्या लहरींसारखे दिसतात. कारण लोहाचे प्रमाण जास्त असलेल्या वाळूच्या खडकांवर लाखो वर्षे वारा आणि पाण्याचा मारा झाल्यामुळे हे विलोभनीय डोंगर तयार झाले आहेत.
Read About : Ancient Indian Monsoon – हजारो वर्षांपूर्वी भारतात होता तीव्र मान्सून!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.