मेघालयातील गुहेतून उलगडला ६ हजार वर्षांपासूनच्या पावसाचा पॅटर्न
Ancient Indian Monsoon शिलाँग : मेघालयातील चेरापुंजीजवळील प्रसिद्ध मावसमाई गुहेतील एका ११ सेंटीमीटर लांबीच्या नैसर्गिक चुनखडीच्या संरचनेमुळे (स्टॅलेग्माइट) भारतीय मान्सूनचे हजारो वर्षे जुने रहस्य उलगडले आहे. शास्त्रज्ञांनी या स्टॅलेग्माइटमध्ये जतन केलेल्या सुमारे ६ हजार वर्षांच्या हवामानाच्या नोंदींचा अभ्यास केला असता ईशान्य भारतात मान्सूनच्या तीव्रतेत बदल आढळून आले आहेत. मान्सूनच्या तीव्रतेवर केवळ स्थानिक घटकच नव्हे तर जागतिक हवामान प्रणाली आणि सूर्याशी संबंधित बदलांचाही प्रभाव पडत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मान्सूनचा इतिहास समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा मानला जातो.
स्टॅलेग्माइट हा गुहेच्या छतातून खाली पडणाऱ्या पाण्याच्या क्षारांपासून जमिनीवर तयार होणारा खडकाचा खांब असतो. आयआयटी खडगपूरच्या प्राध्यापिका याचना वर्मा आणि प्रा. अनिल के. गुप्ता, तसेच आयआयएसईआर कोलकाताचे प्रशांत सन्याल यांच्या नेतृत्वाखालील संशोधक पथकाने हा अभ्यास केला आहे. ‘पॅलिओजिओग्राफी, पॅलिओक्लायमेटोलॉजी, पॅलिओइकोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. संशोधकांनी साधारण ११,८०७ ते ५,६२२ वर्षांपूर्वीच्या काळातील ‘इंडियन समर मान्सून’ म्हणजेच भारतीय उन्हाळी मान्सूनच्या गतिशीलतेचा बारकाईने अभ्यास केला. या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, होलोसीन युगाच्या सुरुवातीच्या काळात भारतातील मान्सून अत्यंत तीव्र आणि शक्तिशाली होता, तर मध्य-होलोसीन काळात तो हळूहळू कमकुवत होत गेला.
शिलाँगपासून दक्षिणेला ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील मावसमाई गुहेच्या आत सुमारे ३०० मीटर खोलवर, ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेल्या चेंबरमधून हा ११ सेमीचा स्टॅलेग्माइटचा नमुना गोळा करण्यात आला होता. संशोधकांनी या नमुन्यातील स्थिर ऑक्सिजन समस्थानिकांच्या(आयसोटोप) रचनेचे तसेच त्याच्या खनिज वैशिष्ट्यांचे विश्लेषण करून प्राचीन काळातील पाऊस आणि मान्सूनच्या परिस्थितीची पुनर्निर्मिती केली. अभ्यासानुसार, ११,८०७ ते ७,७०० वर्षांपूर्वीच्या काळात ऑक्सिजन समस्थानिकांची मूल्ये कमी होती, जी अतिशय तीव्र मान्सून दर्शवतात. तर ७,७०० ते ५,६२२ वर्षांपूर्वीच्या काळात ही मूल्ये वाढली, म्हणजेच मान्सून हळूहळू कमकुवत झाला होता.
अटलांटिक महासागरातील बदलांचाही परिणाम
या अभ्यासात आणखी एक रंजक बाब समोर आली आहे, ती म्हणजे ईशान्य भारतातील मान्सून केवळ स्थानिक बदलांवर अवलंबून नव्हता, तर त्यावर उत्तर अटलांटिक महासागरातील हवामान बदलांचा मोठा प्रभाव होता. अटलांटिक महासागरातील उष्णतेचे वहन करणाऱ्या सागरी प्रवाहांच्या प्रणालीमुळे हा परिणाम होत असावा असा अंदाज आहे. याशिवाय, स्टॅलेग्माइटच्या नोंदींमध्ये दर ११० आणि ११८ वर्षांच्या अंतराने हवामानाचे विशिष्ट आवर्तन दिसून आले. हे थेट सूर्याच्या दीर्घकालीन सक्रियतेशी सुसंगत आहे. तिबेटचे पठार आणि हिंदी महासागरामधील तापमानातील फरक, पॅसिफिक महासागरातील हालचाली आणि सौर लहरी या सर्वांनी मिळून भारतीय मान्सूनची तीव्रता नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दक्षिण आशियातील शेती, पाण्याचा साठा आणि मानवी उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या मान्सूनचा पूर्वइतिहास समजून घेण्यासाठी हे भूगर्भीय संशोधन अत्यंत मैलाचा दगड मानले जात आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Cyclone Murasu in Andhra Pradesh- आंध्र प्रदेश व ओडिशात मुरासू चक्रीवादळामुळे अलर्ट
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.