शिक्षक, डॉक्टरांचा होणार गौरव, ‘वन चाइल्ड वन स्कूल’ अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती
छत्रपती संभाजीनगर: Type 1 Diabetes Awareness – टाइप १ मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लवकर ओळख, वेळीच कृती’ या संकल्पनेतून उडान संस्थेच्या वतीने मराठवाड्यातील ग्रामीण भागातील ४६० शाळांमध्ये ‘वन चाइल्ड वन स्कूल’ अभियान राबविण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना टाइप १ मधुमेहाची लक्षणे, वेळीच निदान आणि उपचारांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या उपक्रमात योगदान देणाऱ्या शिक्षक आणि डॉक्टरांचा ‘उडान इम्पॅक्ट अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. यंदा ‘मधुमेहाबाबत वेळीच कृती’ ही संकल्पना घेऊन जनजागृती केली जात आहे. याच अनुषंगाने उडान संस्थेने शाळांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम हाती घेतला. टाइप १ मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वत: पुढाकार घेत आपल्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधला. वारंवार लघवी होणे, खूप तहान लागणे, वजन कमी होणे आणि अशक्तपणा ही टाइप १ मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे असल्याची माहिती देण्यात आली. या अभियानांतर्गत शाळांमध्ये माहितीपूर्ण पोस्टर्स लावण्यात आले, तसेच मुख्याध्यापकांना पत्र देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. टाइप १ मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित आणि भेदभावमुक्त वातावरण मिळावे, त्यांना नियमित औषधोपचार व आरोग्य व्यवस्थापनासाठी सहकार्य मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
उपक्रमात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा ‘उडान इम्पॅक्ट अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. टाइप १ मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेणारे, त्यांना सहकार्य करणारे आणि शाळेत सकारात्मक वातावरण निर्माण करणारे शिक्षक तसेच ग्रामीण भागातील मुलांचे वेळीच निदान व उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव होणार आहे. शाळांमध्ये लक्षणे वेळीच ओळखून मुलांना आरोग्यसेवेकडे पाठविल्यास डायबेटिक केटोॲसिडोसिस (डीकेए) सारखी गंभीर गुंतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते. दरम्यान, रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत एसएफएस मैदानावर ‘उडान उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्यदायी खाद्यपदार्थ, मनोरंजक खेळ, प्रश्नमंजुषा, चित्रकला व कलाप्रदर्शन आणि विविध सहभागी उपक्रम होणार आहेत.
मराठवाड्यासह १८ जिल्ह्यांतील टाइप १ मधुमेह असलेली मुले, तरुण आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी होणार आहेत. कार्यक्रमातील विशेष रंगमंचीय सादरीकरण सकाळी ११.३० ते दुपारी १२.१५ या वेळेत होणार आहे. या उपक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, सीएमआयएचे अध्यक्ष ए. नंदावत आणि सचिव अजिंक्य सावे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
Read About : Ghati Hospital Bronchoscopy Almond Removed Child – दिवाळी पहाट ठरली चिमुकल्यासाठी जीवनदानाची!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.