कोकणातून पाणी वळविण्याची प्रक्रिया सुरू – विखे पाटील, सर्वेक्षणासाठी प्रशासकीय मान्यता प्रलंबित
परभणी Water for 54 Villages in Parbhani : परभणी आणि मानवत तालुक्यातील माथ्यावरील व पावसावर अवलंबून असलेल्या ५४ गावांना पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ६० दलघमी पाण्याची आवश्यकता असल्याचे शासनाच्या जलसंपदा विभागाच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. या गावांसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करण्याच्या दृष्टीने कोकणातून दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणी वळविण्याच्या योजनेची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषद सदस्य सदाभाऊ खोत यांना दिलेल्या पत्रातून समोर आली आहे.
सन २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १७ मार्च २०२५ रोजी विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या औचित्याच्या मुद्दा क्रमांक ८६ च्या अनुषंगाने जलसंपदा मंत्र्यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी हे उत्तर दिले आहे. शासनाच्या उत्तरानुसार, मानवत आणि परभणी तालुक्यातील ५४ गावांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ६० दलघमी पाण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, १४ ऑक्टोबर २०२१ च्या पत्रानुसार मध्य गोदावरी खोऱ्यात उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन पूर्ण झाले असल्याने या स्त्रोतामधून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याची मर्यादा यातून स्पष्ट करण्यात आली आहे.
दरम्यान, २३ ऑगस्ट २०१९ आणि १९ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयांनुसार दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविण्याच्या योजनांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. या माध्यमातून २ हजार २०९ दलघमी पाणी वळविण्यासाठी पूर्वव्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आला आहे. या योजनेचा समरूपता अभ्यास करून अहवाल राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच पाणी वळविण्याच्या योजनेच्या अनुषंगाने सर्वेक्षण, अन्वेषण आणि अंदाजपत्रके तयार करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषण करून प्रत्यक्ष किती क्षेत्र सिंचनाखाली आणता येईल आणि किती पाणी उपलब्ध करून देता येईल, हे निश्चित होणार आहे.
कालबद्ध कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक
या योजनेच्या पुढील प्रक्रियेला गती देणे, सर्वेक्षण व अन्वेषणासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता देणे, ५४ गावांसाठी आवश्यक असलेल्या ६० दलघमी पाण्याच्या उपलब्धतेबाबत स्वतंत्र नियोजन करणे आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा व सिंचनाचा लाभ मिळण्याबाबत स्पष्ट कालबद्ध कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या गावांना कायमस्वरूपी पाणी मिळाल्यास शेती, पशुधन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे शासनाने या विषयाला प्राधान्य देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
माथ्यावरील तहानलेली हिच ती ५४ गावे
परभणी तालुका (३२ गावे) : मांडाखळी, डफवाडी, उमरी, बाभळगाव, उजळअंबा, नरसापूर, नागापूर, सोन्ना, जांब, आळंद, मोहपुरी, पान्हेरा, भोगाव, किन्होळा, पेडगाव, कौडगाव, पारवा, तुळजापूर, गव्हा, गोविंदपूर, आर्वी, टाकळी (कु.), धर्मापुरी, शहापूर, हसनापूर, इस्माईलपूर, एकरूखा, पिंपळगाव, ब्रह्मपुरी तर्फ पेडगाव, वडगाव, कष्टगाव आणि सारंगपूर.
मानवत तालुका (२२ गावे) : पिंपळा, पाळोदी, सावळी, सावरगाव, देवलगाव अवचार, हत्तलवाडी, आंबेगाव, बोंदरवाडी, खडकवाडी, नागरजवळा, मानोली, करंजी, खरबा, रुढी, मानवत रोड, कोल्हावाडी, कोल्हा, जंगमवाडी, मांडवडगाव, सोनुळा, ताडबोरगाव आणि मानवत.
Read About : AI Shopping in India- ऑनलाइन खरेदीसाठी एआयचा वापर वाढला
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.