दोघे गंभीर जखमी, वाहनधारकांचे हाल
फर्दापूर Ajanta Ghat Truck Accident : छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा घाटात गुरुवारी (दि. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात किराणा मालाने भरलेला ट्रक पलटी होऊन दोघे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे वाहतूक तब्बल ११ तास ठप्प झाली होती.
घाट चढणारा किराणा मालाचा ट्रक (एमएच २३, ५२९७) आणि समोरून येणाऱ्या रिकामा ट्रक (आरजे ०९ जीबी ८९८७) ची दर्गा परिसरात जोरदार धडक झाली. यात आतिश चंद्रभान राठोड (२६, रा. बीड) आणि प्रलयनाथ धाकन (५५, रा. राजस्थान) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
अपघातानंतर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तीन होमगार्ड तैनात करण्यात आले होते. मात्र, काही वाहनचालकांनी रांगा तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने कोंडीत भर पडली. अनेक वाहनधारकांना रात्रभर अडकून पडावे लागले.शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
हळदा घाटातही वाहतुकीचा खोळंबा
सोयगाव : अजिंठा घाटात ट्रक पलटी झाल्याने वाहतूक ठप्प झालेली असतानाच पर्यायी मार्ग असलेल्या हळदा घाटातही अवजड ट्रक अडकल्याने वाहनधारकांची दुहेरी कोंडी झाली. शुक्रवारी (दि.१३) रात्री सोयगावकडे येणारा ट्रक घाटातील पहिल्याच वळणावर अडकल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली. अजिंठा घाटातील वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांनी हळदा घाटाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर सुरू केला होता. मात्र, अरुंद रस्ता आणि धोकादायक वळणांमुळे अवजड वाहनांना मार्ग काढणे कठीण ठरत आहे.
घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा
ट्रक आडवा अडकल्याने इतर वाहनांना पुढे जाण्यास जागा न मिळाल्याने घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रात्री अनेक वाहनधारकांना तासन्तास अडकून पडावे लागले. बससेवेवरही परिणाम झाला. अजिंठा घाटातील वाहतूक वारंवार विस्कळीत होत असल्याने हळदा घाटाचा वापर वाढला आहे. मात्र, अवजड वाहनांसाठी हा मार्ग अडचणीचा ठरत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Read About : AI Shopping in India- ऑनलाइन खरेदीसाठी एआयचा वापर वाढला
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.