Ad Advertisement Ad Advertisement

Bombay High Court Abetment of Suicide Case – पती-पत्नीतील भांडणातील शब्द गुन्ह्याशी जोडता येणार नाहीत

उच्च न्यायालयाचे निरीक्षण, आरोपी पतीला जामीन

मुंबई : Bombay High Court Abetment of Suicide Case पती-पत्नीमधील कौटुंबिक वादादरम्यान रागाच्या भरात पतीने पत्नीला ‘तुला जे करायचे आहे ते कर’ असे सांगणे, हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले. वैवाहिक आयुष्यातील मतभेद आणि भांडणादरम्यान उच्चारलेले शब्द यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याशी सरसकट जोडता येणार नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी पतीला सशर्त जामीन मंजूर केला.

न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने हा निर्णय देताना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आरोपीकडून जाणीवपूर्वक केलेली प्रत्यक्ष आणि सकारात्मक कृती असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. केवळ वैवाहिक वादात काही शब्द उच्चारले गेले म्हणून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, असे नमूद केले. त्यासाठी आरोपीची भूमिका, त्याचा हेतू आणि आत्महत्येशी असलेला प्रत्यक्ष संबंध तपासणे आवश्यक असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले. तसेच उपलब्ध परिस्थितीत आरोपीला पोलीस कोठडीत ठेवून चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट करून त्याला १५ हजार रुपयांच्या मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील दाम्पत्याचा विवाह जुलै २०२५ मध्ये झाला होता. पती कामात व्यस्त असल्याने पत्नीला पुरेसा वेळ देत नव्हता. तसेच तिला बाहेर फिरायला किंवा नातेवाईकांकडे घेऊन जात नसल्याचा आरोप अभियोजन पक्षाने केला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. पतीने आपले म्हणणे ऐकले नाही, तर आत्महत्या करेन, असे पत्नीने सांगितले होते. त्यावर संतप्त झालेल्या पतीने ‘तुला जे करायचे आहे ते कर’ असे म्हटले. त्यानंतर तो स्वत:च्या भावाच्या घरी निघून गेला. काही काळानंतर पत्नीने आत्महत्या केली. याप्रकरणी पुण्यातील एका पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read About : Supreme Court two child disqualification rule – 2 पेक्षा अधिक अपत्यांवरून निवडणूक अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या न्यायपीठाकडे

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.