फलंदाजांच्या हाराकिरीमुळे ८९ धावांमध्ये खुर्दा; हेन्री आणि यंगमुळे न्यूझीलंडचे आव्हान कायम
माउंट माउंगानुई : India vs New Zealand ODI प्रमुख फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेतील चौथ्या लढतीमध्ये लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. विल यंगच्या (१२५ धावा) शानदार शतकानंतर न्यूझीलंडकडून विजयासाठी मिळालेले ३३४ धावांचे आव्हान सर करताना भारताचा डाव २६.४ षटकांमध्ये अवघ्या ८९ धावांवर आटोपला. परिणामी न्यूझीलंडने तब्बल २४४ धावांनी विक्रमी विजयाची नोंद करत पाच सामन्यांच्या मालिकेतील आपले अस्तित्व १-२ असे कायम ठेवले आहे. मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना रविवारी खेळला जाईल.
नियमित कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्याशिवाय खेळणाऱ्या भारतीय फलंदाजांची उसळत्या चेंडूवर भंबेरी उडाली. हेन्रीने डावातील पहिल्याच षटकात रोहित शर्मा (०), विराट कोहली (०) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (०) यांना बाद करत भारताची आघाडीची फळी उद्ध्वस्त केली. एकदिवसीय सामन्यांमध्ये खाते न उघडता भारताने तीन गडी गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा प्रकार घडण्याची ही पाचवी वेळ आहे. सलामीला उतरलेला ऋतुराज गायकवाड ५ बाद झाल्यामुळे सहा षटकांमध्ये ४ बाद ९ अशी भारताची नाजूक परिस्थिती झाली होती.
त्यानंतर मधल्या फळीतील इशान किशन (२७) आणि अक्षर पटेल (२१) यांनी पाचव्या गड्यासाठी ४४ धावा जोडून काही काळासाठी भारताची घसरण थांबवली, पण ही भागीदारी तुटताच भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. या दोघांव्यतिरिक्त फक्त नमन धीरला (२१) दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून या डावात दोन षटकार लगावणारा तो केवळ एकमेव फलंदाज होता. एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० पेक्षा कमी धावांवर सर्वबाद होण्याची भारताची ही आठवी वेळ आहे. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने २७ धावांत सहा बळी घेत भारताची फलंदाजी कापून काढली. मॅथ्यू फिशरनेही (३१ धावांत ३ बळी) त्याला दुसऱ्या बाजूकडून उत्कृष्ट साथ दिली.
यंगने दोन जीवदानाचा फायदा घेत १०८ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि ४ षटकारांनी कारकिर्दीतील पाचवी शतकी खेळी सजवली. डावातील दुसऱ्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूवर आकिब नबीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने स्लिपमध्ये आणि यष्टीरक्षक इशान किशनने ५ धावांवर त्याचे झेल सोडले. यंगने त्यानंतर सलामीचा साथीदार टिम सायफर्ट (४८ चेंडूंमध्ये ५८ धावा, ६ चौकार, ३ षटकार) सोबत १२ षटकांमध्ये ८५ धावांची सलामी दिली. त्यानंतर सायफर्टने फिन ॲलन (४१ धावा, ५ चौकार, २ षटकार) सोबत जोडी बनवत चौथ्या गड्यासाठी ६५ चेंडूंत ९० धावा जोडल्या. मिचेल ब्रेसवेल १५, कर्णधार मिचेल सॅँटनर २४, क्रिस्टिन क्लार्क २२ आणि कायले जेमिन्सनने नाबाद १९ धावांचे योगदान देत ५० षटकांत सर्वबाद ३३३ धावा उभारून दिल्या. भारताकडून आकिब नबी, गुरनूर ब्रार या वेगवान गोलंदाजांसोबत फिरकीपटू अक्षर पटेलने प्रत्येकी २ बळी घेतले.
धावांच्या बाबतीत दुसरा मोठा पराभव
भारताचा धावांच्या बाबतीत हा आतापर्यंतचा दुसरा मोठा पराभव आहे. याअगोदर श्रीलंकेने शारजामध्ये भारतावर २४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता.
सहावी निच्चांकी धावसंख्या
भारताची सर्वबाद ८९ ही एकदिवसीय प्रकारातील सहावी निच्चांकी धावसंख्या आहे. श्रीलंकेविरोधातील २००० मधील शारजातील ५४ ही धावसंख्या या पंक्तीत पहिल्या स्थानी येते.
पराभवाचे खापर खेळपट्टीवर-श्रेयस
कर्णधार श्रेयस अय्यरने भारताच्या दारूण पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले आहे. याबाबत श्रेयस म्हणाला, न्यूझीलंडच्या डावात खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती, पण नंतर वेगवान गोलंदाजांना सहाय्यक ठरली. दोन्ही डावांमधील खेळपट्टीच्या स्वरूपामध्ये खूप मोठा फरक होता. आपल्याला हा पराभव विसरून आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीत चुकांचे विश्लेषण करून नव्या जोमाने सुरुवात करावी लागेल.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : India vs New Zealand ODI Series – वेगवान गोलंदाजांचा प्रभावी मारा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.