Ad Advertisement Ad Advertisement

Ausa Fort Ancient Inscription – औसा भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीवर आढळला प्राचीन शिलालेख

इतिहासातील अज्ञात पैलू उलगडण्याची शक्यता

औसा (जि. लातूर) Ausa Fort Ancient Inscription : जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या औसा भुईकोट किल्ल्याच्या तटबंदीवर प्राचीन कोरीव शिलालेख आढळून आला आहे. किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना निलंगा येथील इतिहास अभ्यासक सौदागर बेवनाळे यांच्या निदर्शनास हा ऐतिहासिक ठेवा आला. या शोधामुळे औसा नगरीच्या प्राचीन इतिहासातील अज्ञात पैलू उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

किल्ल्याच्या उजव्या बाजूच्या तटबंदी परिसराची पाहणी करताना बेवनाळे यांना प्रथम एक कोरीव शिल्पखंड दिसून आला. त्याचे बारकाईने निरीक्षण केले असता त्याच दगडाच्या दुसऱ्या बाजूला कोरलेली अक्षरे आढळली. छायाचित्रणानंतर हा शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यावरील मजकुराचे वाचन अद्याप होऊ शकलेले नाही. ऐतिहासिक संदर्भग्रंथांचा अभ्यास करूनही या शिलालेखाबाबत ठोस माहिती मिळाली नसल्याचे बेवनाळे यांनी सांगितले. तज्ज्ञांकडून शास्त्रीय पद्धतीने शिलालेखाचे वाचन झाल्यास औशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

मध्ययुगीन काळातील व्यापार, धार्मिक परंपरा आणि संत-महंतांच्या कार्यामुळे औशाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे या शिलालेखाचे पुरातत्त्व व भाषाशास्त्रातील तज्ज्ञांकडून संशोधन करून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. या संशोधनातून औशाच्या इतिहासाचा नवा अध्याय उजेडात येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

असा आहे किल्ल्याचा इतिहास

औसा भुईकोट किल्ल्याची उभारणी इ.स. १४६६ मध्ये बहामनी साम्राज्याचे वजीर महमूद गवान यांनी केल्याचे ऐतिहासिक नोंदींत नमूद आहे. औसा नगरीचा उल्लेख चालुक्यकालीन ताम्रपटात ‘उच्छीव त्वरीशत’, जैन साहित्यात ‘औच्छ’, तर कवी कनकामर यांच्या साहित्यात ‘असई’ असा आढळतो. प्राचीन काळी औसा हे दिगंबर जैन धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते. नव्याने आढळलेल्या शिल्पखंडाचाही जैन परंपरेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read About : AI Shopping in India- ऑनलाइन खरेदीसाठी एआयचा वापर वाढला
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.