Ad Advertisement Ad Advertisement

Guardian Minister Bungalow Ruckus – पालकमंत्र्यांच्या बंगल्यासमोर गोंधळ घालणाऱ्या तरुणांना अटक

शहर पोलिसांची अवघ्या ५ मिनिटांत कारवाई : उपायुक्त नवले यांनीही घेतली धाव

छत्रपती संभाजीनगर : Guardian Minister Bungalow Ruckus गोलवाडी लिंक रोड भागात असलेल्या पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाबाहेर तीन मद्यपींनी गोंधळ घातला होता. बंगल्याच्या दिशेने दारूच्या बाटल्या फेकल्या. तसेच, तेथे सुरक्षेसाठी तैनात पोलिसांशी हुज्जत घातल्याची घटना गुरुवारी (दि. १२) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. यातील तिन्ही आरोपींना शहर पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लगेचच अटकही केली. तसेच, घटनास्थळी पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, वरिष्ठ निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी धाव घेतली होती. दरम्यान, पालकमंत्री शिरसाट यांनी पोलिसांवर वेगवेगळे आरोप केल्याने याची पुन्हा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.


रोहित स्वप्निल भुताळे (२४, रा. एन-१, सिडको, ह.मु. उल्कानगरी), शिवम ज्ञानेश्वर गायकवाड (२४, रा. उल्कानगरी) आणि प्रतिक चांगदेव कुटे (२५, मूळ रा. गेवराई, जि. बीड, ह.मु. उल्कानगरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. गुरुवारी तिघे आरोपी आपल्या ईव्ही चेतक मोपेडवरून (एमएच २३, बीआर ८५३४) पालकमंत्री शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर आले. नशेत असलेल्या या तिघांनी बंगल्याच्या दिशेने दारूची बाटली फेकली व एक बाटली फोडून खासगी सुरक्षारक्षक कमलेश परदेशी आणि संतोष महालकर यांच्याशी झटापट सुरू केली. तिथे ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार विजय दारुंटे (५२) यांनी तातडीने धाव घेत सुरक्षारक्षकांच्या मदतीने या तिघांना तिथून हुसकावून लावले. मात्र, काही वेळातच हे तिघे पुन्हा दुचाकीवरून आले आणि पुन्हा गोंधळ घातला होता. त्यावेळी एका आरोपीने स्वत:ला ओएसडी सांगत वरपर्यंत ओळख असल्याची धमकी दिली. तिघांनी मिळून पोलीस अंमलदार दारुंटे व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पाच मिनिटांत डायल ११२ घटनास्थळी

तिन्ही तरुणांनी पुन्हा येऊन गोंधळ घालताच अंमलदार दारुंटे यांनी डायल ११२ वर कॉल करून मदत मागवली. त्यावर अवघ्या पाच मिनिटांत डायल ११२ वाहन पालकमंत्री शिरसाट यांच्या घरी पोहोचले. त्यांनी तिन्ही आरोपींना दुचाकीसह ताब्यात घेत ठाण्यात नेले. अंमलदार दारुंटे यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक दिलीप बचाटे पुढील तपास करत आहेत.

पालकमंत्र्यांच्या कुटुंबीयांना १८ पोलिसांचा बंदोबस्त
  • ट्राफिक क्लिअरन्ससाठी ४ (१ उपनिरीक्षक, २ अंमलदार व १ चालक)
  • एस्कॉर्टसाठी ५ (१ अधिकारी, ३ अंमलदार व १ चालक)
  • मुलगी नगरसेवक हर्षदा यांना २ गनमन
  • मुलगा नगरसेवक सिद्धांत यांच्यासाठी २ गनमन
  • निवासस्थानासाठी १+४ (एकूण ५ अंमलदार)

Read About : Diwali Firecracker Disputes in CSN दिवाळीत फटाक्यांवरून वादाचे स्फोट; अकरा ठिकाणी चाकूहल्ले!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.