Ad Advertisement Ad Advertisement

Diwali Firecracker Disputes in CSN दिवाळीत फटाक्यांवरून वादाचे स्फोट; अकरा ठिकाणी चाकूहल्ले!

८ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल : चाकू, रॉड, पाईप अन् फायटरने सपासप वार

छत्रपती संभाजीनगर : Diwali Firecracker Disputes in CSN दिवाळीच्या उत्साहात कोट्यवधींच्या फटाक्यांची आतषबाजी सुरू असतानाच, सुरक्षिततेचे भान न ठेवल्याने अनेक ठिकाणी वादाच्या ठिणग्या उडाल्या तर, काही ठिकाणी या फटाक्यांवरून वादाचे स्फोटही झाले. किरकोळ वादाचे रूपांतर थेट रक्तरंजित हाणामारीत होऊन ६ ते ११ नोव्हेंबरदरम्यान शहरातील ८ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ११ ठिकाणी तुफान हाणामारी व चाकूहल्ल्याच्या घटना घडल्या. घरासमोर किंवा गाडीजवळ फटाके फोडण्यास मनाई करणे आणि अंगावर किंवा वाहनावर पेटता फटाका फेकल्याचा जाब विचारणे, या कारणावरून हे वाद झाल्याचे समोर आले.

विशेष म्हणजे, या वादात चाकू, लोखंडी रॉड, पाईप, धारदार शस्त्रे आणि फायटरने सपासप वार झाल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी मुकुंदवाडी, बेगमपुरा आणि जवाहरनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक प्रत्येकी दोन गुन्हे नोंदवले गेले आहेत. बेगमपुरा आणि जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजाऱ्यांचे दोन गट आमनेसामने आले. याशिवाय छावणी, सातारा, सिडको, पुंडलिकनगर आणि वेदांतनगर पोलीस ठाण्यांतही प्रत्येकी एक गुन्हा दाखल झाला आहे.

मुकुंदवाडीत तरुणाच्या गालावर वार, दाम्पत्याला रस्त्यावर मारहाण

फटाक्यांच्या वादातून मुकुंदवाडी हद्दीत दोन गंभीर घटना घडल्या. पहिल्या घटनेत, संतोषीमातानगर येथे ८ नोव्हेंबरच्या रात्री घरासमोर फटाके फोडताना चुलत बहिणीच्या अंगावर पेटता फटाका फेकल्याचा जाब विचारल्यावरून रघुवीर, सागर आणि सुलतान यांनी रोहीतवर शस्त्रांनी हल्ला केला. त्यात रोहित नावाचा तरुण जखमी झाला. दुसऱ्या घटनेत, स्वराजनगर येथे ९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घरासमोर फटाके फोडू नका, असे सांगितल्याच्या रागातून कुंवरसिंग राजपूत, जगतराम यादव, सुनीता राजपूत आणि शुभम यांनी ३४ वर्षीय महिलेला खाली पाडून लाथा मारल्या, तर तिच्या पतीला सिमेंटच्या रस्त्यावर फरफटत नेऊन जखमी केले.

घाटी क्वार्टरमध्ये शेजाऱ्यांमध्ये चाकूहल्ला

बेगमपुरा हद्दीतील घाटी मेडिकल क्वार्टर परिसरात ८ नोव्हेंबरच्या रात्री वाहनाजवळ फटाके फोडू नका, असे सांगितल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्येच रक्तरंजित राडा झाला. सुमित रवींद्र सौदे (३८) हे मुलांसोबत फटाके फोडत असताना गाडीला आग लागेल असे म्हणत शेख शहाबाज, शेख हारुन आणि शेख गुड्डू यांनी वाद घातला. यात शेख शहाबाजने सुमित यांच्यावर चाकूने वार केले आणि त्यांच्या पत्नी व बहिणीला मारहाण केली. तर दुसऱ्या बाजूने सेवानिवृत्त कर्मचारी शेख हारुण शेख करीम (६१) यांनी दुचाकीजवळ फटाके फोडू नका असे सांगितल्याने सुमित सौदे व दोन महिलांनी त्यांना मारहाण केली. यावेळी सुमितने चाकूने शेख हारुण आणि त्यांचा मुलगा शेख शहाबाज यांच्या डाव्या हातावर वार करून जखमी केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

सौजन्यनगरात दगडफेक करीत दोन गट भिडले

जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीतील सौजन्यनगर भागात ८ नोव्हेंबरच्या रात्री एकाच मोहल्ल्यातील दोन गटांत फटाके फोडण्यावरून तुंबळ हाणामारी झाली. एका गटाच्या ३४ वर्षीय गृहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सनी निकाळजे, अभिषेक निकाळजे, सुनील निकाळजे, चिऊ यांच्यासह आठ जणांनी दगड-विटा फेकून मारहाण केली व सनीने चाकूने वार करून महिलेला व साक्षीदारांना जखमी केले. तर समोरील गटातील ४२ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, अशोक जाधव, राजू आव्हाड, विजय आव्हाड, आनंद साळवे आणि पाच महिला अशा नऊ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून महिलेला व साक्षीदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

छावणीत पोटात चाकू खुपसला

नेहरू पुतळ्याजवळ ८ नोव्हेंबरला रात्री दुचाकीवर फटाके का फेकले, याचा जाब विचारल्यावरून तीन अनोळखींनी शेख अफ्फान (२०) व शेख जाहेद यांना मारहाण करत जाहेदच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.

साताऱ्यात लोखंडी रॉड व चाकूने हल्ला

महूनगर गल्ली क्र. ३ येथे ८ नोव्हेंबरला सायंकाळी दुचाकीवर फटाका फेकल्याच्या वादातून तिघांनी १६ वर्षीय मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला, तर त्याच्या मित्रावर चाकूने वार केला.

सिडकोत पाईप, बेल्टने मारहाण

राजीव गांधी स्टेडियमजवळ फटाका जवळ पडल्याच्या कारणावरून शुभम राठोड, संजोग राठोड व दोन अनोळखींनी सद्दाम पठाण (३१) यांना कमरेच्या बेल्टने आणि लोखंडी पाईपने डोक्यावर व पाठीवर मारून गंभीर जखमी केले.

पुंडलिकनगरात डोक्यात मारले कडे

छत्रपती महाविद्यालयाच्या मैदानावर ८ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता अंगावर फटाका उडाल्याच्या रागातून शंतनू चव्हाण, आदित्य सिरसाठ व दोन जणांनी मजूर मिराज अत्तर खान (२२) याच्या डोक्यात हातातील कड्याने प्रहार करून जखमी केले.

वेदांतनगरात फायटरने फोडले तोंड

रेल्वेस्टेशन रोडवरील एमटीडीसीसमोर ११ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसात वाजता फटाके फोडण्यास मनाई केल्याने विलास खैरे (३८) याने रिक्षाचालक अमित नाथभजन (३९) यांना फायटरने मारहाण करून जखमी केले.

Read About : Beed Land Mafia Gang in CSN – दीड एकर जमिनीचा 14 कोटींत सौदा करून 65 लाख उकळले
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.