Ad Advertisement Ad Advertisement

Wazur Pebble Art 2026 – वझूरच्या गारगोट्यांच्या पेबल आर्टला दिल्लीत राष्ट्रीय व्यासपीठ

आयआयटीएफमध्ये निवड, नवी ओळख मिळण्याची संधी

परभणी : Wazur Pebble Art 2026 : जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील वझूर येथील नैसर्गिक गारगोट्यांपासून साकारल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण ‘पेबल आर्ट’ या कलाप्रकाराला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित ४५ व्या ‘इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (आयआयटीएफ)२०२६’ मध्ये सहभागासाठी दिव्यसृष्टी नॅचरल आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची निवड झाली आहे.

संस्थेच्या माध्यमातून वझूर हस्तकला – पेबल आर्ट हा ब्रँड राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सादर होणार आहे. संस्थेचे प्रल्हाद पवार हे २०१४ पासून पेबल आर्टच्या निर्मिती, संशोधन, प्रशिक्षण आणि प्रसारासाठी कार्यरत आहेत. या कार्यात मोहिनी पवार, भगवान पवार आणि रुक्मिणी पवार यांचे सहकार्य लाभत आहे. संस्थेने यापूर्वी नवी दिल्लीतील नॅशनल क्राफ्ट्स म्युझियम, ललित कला अकादमी, आयआयटीएफ २०२३, केरळमधील कुदुंबश्री प्रदर्शन, तसेच रामपूर येथील हुनर हाट यांसारख्या व्यासपीठांवर सहभाग नोंदविला आहे.

कलाकृतींतून सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विषयांचे दर्शनसंस्थेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या चवदार तळे सत्याग्रहावर आधारित सुमारे ४ हजार ५०० नैसर्गिक गारगोट्यांपासून बनविलेली भव्य कलाकृती, श्री रामेश्वर महादेव पालखी यासारख्या कलाकृती विशेष लक्षवेधी ठरल्या आहेत.

गारगोट्यांपासून तयार पेबल आर्ट स्मृतीचिन्हे भेट

तसेच नवी दिल्ली येथील भारतीय अन्न महामंडळाच्या मुख्यालयातील बोर्ड मीटींग हॉलमध्ये संस्थेची पेबल आर्ट कलाकृती स्थापित करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील आणखी एक उल्लेखनीय टप्पा म्हणजे नवी दिल्ली येथे भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांना वझूरच्या नैसर्गिक गारगोट्यांपासून तयार केलेली विशेष पेबल आर्ट स्मृतीचिन्हे भेट देण्यात आली होती.

उल्लेखनीय बाब

ग्रामीण भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीपासून साकारलेल्या कलेला राष्ट्रीय संस्थांच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात स्थान मिळणे ही संस्थेच्या कार्यासाठी उल्लेखनीय बाब ठरली आहे. प्रल्हाद पवार यांना पेबल आर्टशी संबंधित कॉपीराईटही प्राप्त झाले आहेत. प्रशिक्षणातून ग्रामीण रोजगारनिर्मितीचा प्रयत्न पेबल आर्टचा प्रसार केवळ कलानिर्मितीपुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण भागात कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी संस्थेने आतापर्यंत सुमारे १५ प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. आगामी काळात ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून पेबल आर्ट प्रशिक्षण आयोजित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये ग्रामीण युवक, महिला, बचत गट आणि स्वयंरोजगार इच्छुकांना प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे.

Read About : Natural Weight Loss Peptide : एआयच्या मदतीने शोधला वजन कमी करणारा नवा पेप्टाइड; ओझेम्पिकला पर्याय ठरणार?
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.