ध्वनीतील फरक ओळखणाऱ्यांना परदेशी भाषा शिकणे ठरते अधिक सोपे
टोकियो : Auditory Precision वयाच्या एका टप्प्यानंतर नवीन परदेशी भाषा शिकणे अनेक प्रौढांसाठी कठीण असते. मात्र, ज्या व्यक्तींमध्ये ध्वनीतील सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता म्हणजेच ऑडिटरी प्रिसिजन चांगली असते, त्यांना नवीन भाषा शिकणे अधिक सोपे जाते. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन आणि जपानमधील तोहोकू विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आला आहे.
कसे झाले संशोधन?
संशोधकांनी इंग्रजी शिकणाऱ्या जपानमधील दोन गटांवर (टोकियोतील १४० आणि सेंडाई येथील ६७ विद्यार्थी) हा प्रयोग केला. यामध्ये सहभागींना शब्दांऐवजी तीन साधे ध्वनी ऐकवून त्यातील वेगळा ध्वनी ओळखण्यास सांगितले गेले. त्यानंतर इंग्रजीतील मॅड आणि मड यांसारख्या जवळपास सारख्या वाटणाऱ्या शब्दांमधील स्वरांचा भेद ओळखण्याची त्यांची क्षमता तपासली गेली. तसेच, विद्यार्थ्यांच्या मेंदूतील हालचाली तपासण्यासाठी एफएमआरआय स्कॅनिंगचा वापर करण्यात आला.
मेंदूची कार्यपद्धती आणि निष्कर्ष
संशोधनात असे दिसून आले की, ज्यांची ऐकण्याची सूक्ष्म क्षमता चांगली होती, त्यांनी परदेशी भाषा शिकण्याचा फारसा अनुभव नसतानाही शब्दांमधील उच्चार भेद अचूक ओळखले. अशा व्यक्तींचा मेंदू नवीन ध्वनींकडे थेट भाषा म्हणून न पाहता केवळ एक ध्वनी लहरी म्हणून वस्तुनिष्ठपणे पाहतो. त्यामुळे त्यांच्या मेंदूतील भाषणविषयक भागांवर कमी ताण येतो. याउलट, कमी क्षमता असलेल्या व्यक्ती स्वत:च्या मातृभाषेतील जुन्या सवयींचा आधार घेतात, ज्यामुळे त्यांच्या मेंदूला अधिक कष्ट घ्यावे लागतात.
प्रमुख संशोधक काझुया सायटो-व्हॅन पोएटेरेन यांच्या मते, परदेशी भाषा शिकवताना केवळ शब्दसंग्रह पाठ करून घेण्याऐवजी विद्यार्थ्यांची ऐकण्याची सूक्ष्म क्षमता विकसित करणाऱ्या सरावाचा समावेश केल्यास भाषा शिकणे अधिक सुलभ होऊ शकते.
Read About : Natural Weight Loss Peptide : एआयच्या मदतीने शोधला वजन कमी करणारा नवा पेप्टाइड; ओझेम्पिकला पर्याय ठरणार?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.