Ad Advertisement Ad Advertisement

Teacher Issues Pavitra Portal – पवित्र पोर्टलचा पेच, रिक्त जागा अन् जुनी पेन्शन

शिक्षकांच्या प्रश्नांवर बैठकीत मंथन

छत्रपती संभाजीनगर: Teacher Issues Pavitra Portal – शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर गोदावरी पब्लिक स्कूल, हडको येथे आयोजित शिक्षक संवाद कार्यक्रमात सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षक भरती प्रक्रियेतील अडचणी, पवित्र पोर्टलवरील मर्यादा, आरक्षित प्रवर्गातील रिक्त पदे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण, जुनी पेन्शन योजना आणि टीईटीसह विविध महत्त्वाचे मुद्दे यावेळी उपस्थित करण्यात आले. हे प्रश्न आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.

बैठकीत संस्थाचालकांनी शिक्षक भरती प्रक्रियेतील अडचणींकडे लक्ष वेधले. पवित्र पोर्टलवर उमेदवारांना केवळ तीन संस्थांना प्राधान्य देण्याची संधी असल्याने पात्र उमेदवार मिळविताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: अनुसूचित जाती-जमाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील रिक्त जागांसाठी उमेदवार उपलब्ध होत नसल्याची बाब मांडण्यात आली. यापूर्वी जाहिराती देऊनही संबंधित पदांसाठी उमेदवार मिळाले नसल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. मुलाखतींच्या तारखा आणि शाळा सुरू होण्याच्या वेळापत्रकातील विसंगतीचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. या भरती प्रक्रियेतील अडचणी अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन काळे यांनी दिले.

जुनी पेन्शन ते टीईटी सवलत; विविध प्रश्नांवर चर्चा

बैठकीत जुनी पेन्शन योजना लागू करणे, अंशत: अनुदानित शाळांच्या अनुदानाचा पुढील टप्पा वाढविणे, शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, आश्वासित प्रगती योजना १०-२०-३० लागू करणे, शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करणे, २०१० पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटीतून सूट देणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करणे आणि जनगणनेच्या कालावधीतील हक्काच्या सुट्टया देणे आदी मागण्यांवर चर्चा झाली.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाइन घेण्याची मागणी

शिक्षकांच्या हक्काच्या दीपावली सुट्टीत वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण आयोजित केले जात असल्याने शिक्षकांची सुट्टी प्रशिक्षणात जात असल्याचा मुद्दा बैठकीत चर्चेला आला. यापुढे हे प्रशिक्षण सुट्टीच्या कालावधीत न घेता ऑनलाइन पद्धतीने घेण्यात यावे, अशी मागणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे करणार असल्याचे आ. काळे यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मनोज खुटे, जिल्हा कार्याध्यक्ष अकील पठाण, तालुकाध्यक्ष अविनाश काळे, मुख्याध्यापक संघाचे पी. एम. पवार, सुनील जाधव, प्रा. हिवर्डे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक उपस्थित होते.

Read About : Navodaya Entrance Exam – नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 17 हजार 402 विद्यार्थी सज्ज
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.