Ad Advertisement Ad Advertisement

SeaNav Digital Platform – जहाजांची टक्कर रोखण्यासाठी आयआयटी मद्रासने विकसित केले अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म

समुद्रात प्रत्यक्ष जहाज न उतरवताच सुरक्षित वाहतुकीच्या तंत्रज्ञानाची चाचणी शक्य

नवी दिल्ली : SeaNav Digital Platform जहाजांना प्रत्यक्ष समुद्रात न उतरवताच त्यांच्या सुरक्षित वाहतुकीचे आणि टक्कर टाळणाऱ्या तंत्रज्ञानाचे परीक्षण करणे आता शक्य होणार आहे. आयआयटी मद्रासच्या महासागर अभियांत्रिकी विभागातील संशोधकांनी सीनेव्ह नावाचे एक अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले आहे.

आभासी सागरी वातावरण

युनिटी-३डी तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेल्या या प्लॅटफॉर्मवर समुद्राच्या लाटा, हवामान, जहाजांची हालचाल आणि आसपासच्या इतर जहाजांची हुबेहूब आभासी प्रतिकृती तयार केली जाते. यामध्ये एआय, व्हर्च्युअल रिॲलिटी, समुद्री रडार, लेझर आधारित अंतर मोजणारी प्रणाली आणि कॅमेऱ्यांमधून मिळणाऱ्या माहितीचा एकत्रित वापर करण्यात आला आहे. संशोधकांनी यावर एआयच्या मदतीने जहाजांना स्वत:चा मार्ग निवडताना आणि टक्कर टाळताना यशस्वीरित्या दाखवले आहे.

खर्च आणि जोखमीत बचत

जगातील ८० टक्क्यांहून अधिक व्यापार सागरी मार्गाने होतो. मात्र, खुल्या समुद्रात नवीन तंत्रज्ञानाची चाचणी घेणे अत्यंत खर्चिक आणि खराब हवामानामुळे धोकादायक असते. सीनेव्हमुळे प्रत्यक्ष जहाज समुद्रात न उतरवता हजारो तास विविध कठीण परिस्थितींमध्ये चाचणी घेता येते. या प्रणालीची अचूकता तपासण्यासाठी सुमारे ३२० मीटर लांबीच्या एका मोठ्या तेल टँकरचा मानक जहाज म्हणून वापर करण्यात आला आहे.

याशिवाय, धुकं, पाऊस आणि कमी दृश्यमानतेत सेन्सरच्या माहितीत येणारा विलंब आणि त्रुटींचाही यात समावेश केला आहे, जेणेकरून प्रत्यक्ष संकटाच्या काळातील अचूक चाचणी घेता येईल. या प्लॅटफॉर्ममुळे मानवी नियंत्रणाशिवाय चालणाऱ्या (स्वयंचलित) जहाजांचा विकास सोपा होणार असून, गजबजलेल्या सागरी मार्गांवर आणि बंदरांजवळ एकाच वेळी अनेक जहाजांचे सुरक्षित संचालन कसे करावे, याचे प्रशिक्षणही सागरी व्यावसायिकांना देता येणार आहे.

Read About : GPS-Free Drone Navigation System – मंगळासाठी केले संशोधन, कामी येणार लष्कराच्या…
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.