Ad Advertisement Ad Advertisement

Nuclear Explosion Asteroid Deflection – अणुस्फोट लघुग्रहाच्या धडकेपासून पृथ्वीला वाचवू शकतो, पण…

स्फोट कोणत्या बाजूला केला यावर यशापयश अवलंबून

वॉशिंग्टन : Nuclear Explosion Asteroid Deflection – एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने आला तर काय करायचे, हा प्रश्न शास्त्रज्ञांना अनेक वर्षे सतावत आहे. यावर अणुस्फोट हा एक उपाय मानला जातो. लघुग्रहाजवळ अणुस्फोट घडवल्यास त्याचा मार्ग बदलू शकतो. स्फोटातून निघणारे क्ष-किरण लघुग्रहाचा पृष्ठभाग तापवतील आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या वाफेच्या धक्क्याने त्याची दिशा बदलेल, असे हा उपाय सुचवितो. पण, अमेरिकेतील एका नव्या अभ्यासातून हा अणूस्फोट लघुग्रहाच्या कोणत्या बाजूला केला गेला यावर त्याचे यशापयश अवलंबून असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेतील सँडिया नॅशनल लॅबोरेटरीजचे भौतिकशास्त्रज्ञ नेथन मूर यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी संगणकावर हा प्रयोग केला. आधीच्या प्रतिकृतींत लघुग्रह गुळगुळीत गोल असल्याचे गृहीत धरले जायचे. प्रत्यक्षात लघुग्रह हे ओबडधोबड असतात. या चमूने अवकाशयानांनी काढलेल्या त्रिमितीय छायाचित्रांवरून लघुग्रहाचा खरा ओबडधोबड आकार संगणकात उभा केला. मग स्फोटाची तीव्रता, अंतर आणि दिशा बदलून काय होते, याचे प्रयोग संगणकावर केले. ही नवी पद्धत आधीच्या पद्धतींपेक्षा १,६०० पटींहून अधिक वेगवान आहे. अणुस्फोटातून क्ष-किरण बाहेर पडतात. त्यामुळे लघुग्रहाचा पृष्ठभाग तापतो आणि त्यातला काही भाग वाफ होऊन उडतो. या वाफेच्या धक्क्याने लघुग्रह दुसऱ्या दिशेला ढकलला जातो.

प्रयोगाने झाले सिद्ध

अणुस्फोटाने लघुग्रहाला वाट बदलायला लावता येते हे स्पष्ट झाले. हा उपाय लाभदायक असला तरी स्फोट कोणत्या दिशेने घडवला, यावर सगळे अवलंबून असते. एका लघुग्रहावर एका दिशेने किरण पडले तेव्हा त्याचा वेग सेकंदाला ३.९ मिलिमीटरने बदलला. दुसऱ्या दिशेने तो फक्त ०.८ मिलिमीटर बदलला. म्हणजे जवळपास पाचपट फरक. आणखी एका लघुग्रहाच्या फिरण्याच्या गतीत दिशेनुसार १७ पट फरक पडला. मात्र अडचणीही आहेत. ही प्रतिकृती फक्त वरच्या खडकाचे तुकडे होण्याचा अंदाज बांधू शकते, संपूर्ण लघुग्रहाचा नाही.

लघुग्रहाचे तुकडे न होता मार्ग बदलायला लावणे महत्वाचे

संशोधकांच्या मते, लघुग्रहाचे तुकडे न होता त्याला वाट बदलायला लावणे महत्त्वाचे आहे. तुकडे झाले, तर अनेक धोकादायक तुकडे पृथ्वीकडेही येऊ शकतात. त्यामुळे त्याचे तुकडे होऊन चालणार नाही. शिवाय अचूक आकार मोजण्यासाठी आधीच माहिती लागते. अचानक सापडलेल्या लघुग्रहाच्या बाबतीत तेवढा वेळ मिळेलच असे नाही. हे संशोधन ‘इकारस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

अभ्यासाला मर्यादा

या अभ्यासाला मर्यादा आहेत. हा अभ्यास फक्त पृष्ठभागावरील खडकाचे काय होईल ते सांगतो. पूर्ण लघुग्रह फुटेल का, हे तो सांगू शकत नाही. लघुग्रहाचा आकार सर्व बाजूंनी माहीत असावा लागतो. नवा लघुग्रह अचानक दिसला, तर तेवढा वेळ मिळणार नाही. अणुबॉम्ब अवकाशात अचूक जागी पोहोचवणे हेही मोठे आव्हान आहे.

Read About : Anti-Jamming FPV Drone – लडाखमध्ये 18000 फूट उंचीवर ‘अद्विक’ ड्रोनची यशस्वी चाचणी E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.