९/११ हल्ल्यानंतर दुसऱ्यांदा एअर इमर्जन्सी, १५ लाख प्रवासी विमानतळांवर अडकले
वॉशिंग्टन : 8000 flights cancelled in USA अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीत अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे संपूर्ण देशभरातील हवाई सेवेवर अभूतपूर्व संकट ओढावले. जवळपास ८,००० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागल्याने सुमारे १५ लाखांहून अधिक प्रवासी विविध विमानतळांवर अडकून पडले. अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील हवाई सेवा ठप्प झाल्याची ही दुसरी वेळ आहे. विमानतळांवर ताटकळलेल्या प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असून, हवाई सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्घपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीत नवीन तंत्रज्ञान जोडण्यात आले आहे. परिणामी जुन्या आणि कालबाह्य झालेल्या उपकरणांवर अतिरिक्त ताण पडला. यामुळे संवाद व रडार यंत्रणेत वारंवार अडथळे निर्माण झाल्याने देशभरातील हवाई सेवा अचानक थांबवण्यात आली. सुरक्षेच्या कारणामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे अमेरिकन प्रशासनाने सांगितले. तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवसांत जवळपास ८,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. शुक्रवारी पाच तासांहून अधिक काळ विमान वाहतूक पूर्णपणे बंद होती. रात्री उशिरा काही मोजकीच देशांतर्गत विमाने रवाना होऊ शकली.
शनिवारीदेखील अनेक विमानतळांवर अशीच स्थिती दिसून आली. विमानसेवेतील हा गोंधळ पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. आगामी ‘थँक्सगिव्हिंग’ सणापूर्वी ही यंत्रणा पूर्ववत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. अचानक विमानसेवा कोलमडल्याने लाखो प्रवाशांना विविध अडचणींना समोरे जावे लागले. अनेक व्यावसायिक आणि महाविद्यालयीन क्रीडा संघांनाही प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागली, तर अनेकांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमांना फटका बसला.
विमानतळांवर अनेक विमाने थांबून असल्याचे, तसेच प्रवासी टर्मिनल्समध्ये ताटकळत असल्याचे चित्र दिसून आले. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात सर्व उड्डाणे रोखण्याची ही दुसरी मोठी घटना आहे. यापूर्वी जानेवारी २०२३ मध्ये फेडरल उड्डाण प्रशासनाच्या मुख्य संगणक प्रणालीत बिघाड झाल्याने अशी परिस्थिती ओढावली होती.
सायबर हल्ल्याची शक्यता फेटाळली
दरम्यान, अमेरिकेने या तांत्रिक बिघाडामागे सायबर हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. प्राथमिक तपासात ही टेलिकम्युनिकेशन सिस्टीममधील तांत्रिक अडचण असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यामागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.
अतिरिक्त निधीची गरज – ट्रम्प
या गंभीर परिस्थितीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील हवाई वाहतूक प्रणालीचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी तब्बल ३० अब्ज डॉलरचा अतिरिक्त निधी मागितला आहे. ट्रम्प यांनी रिपब्लिकन सिनेटर एरिक श्मिट यांच्याशी यासंदर्भात फोनवरून चर्चा केली. निधीसंबंधीचे विधेयक संसदेत लवकर मंजूर करून घेण्यास त्यांना सांगितले. या निधीतून हवाई वाहतूक प्रणाली, एअरपोर्ट टॉवर आणि इतर आवश्यक विमानतळ पायाभूत सुविधा अद्ययावत केल्या जाणार आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Microsoft Global Outage – तंत्रज्ञान जगतात खळबळ
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.