पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला कट : गुंडाला दिली सुपारी
पाटणा : Wife Hires Hitman to Kill Husband – प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेल्या ऑटोचालक पतीची पत्नीने सुपारी देऊन हत्या केल्याची घटना बिहारमध्ये उघडकीस आली. प्रियकरासोबत मिळून रचलेल्या या कटात पत्नीने भाडोत्री मारेकऱ्याला पैसे देण्यासाठी कर्ज काढल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
१० नोव्हेंबरच्या रात्री उशिरा बिहटा परिसरातील सिमरी गावात घरात घुसून ऑटोचालक इरफान इमाम यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली होती. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कसून तपास केला असता, हत्येमागे अनैतिक संबंधांचे कारण समोर आले. इरफानची पत्नी नेहा उर्फ फोजिया फिरदौस हिचे गावातीलच करण कुमार याच्यासोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. पतीला याची कुणकुण लागल्यानंतर दोघांत सतत वाद होऊ लागले. प्रेमात पती अडसर ठरू लागल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याला संपवण्याचा कट रचला.
तपासादरम्यान हत्येसाठी पैशांची जुळवाजुळव कशी केली गेली, याचेधागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. पत्नीने कर्ज काढून या हत्येसाठी ‘सुपारी’ची रक्कम गोळा केली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे. सध्या पोलीस या मुद्द्यावर कसून चौकशी करत असून हत्येसाठी नेमकी किती रक्कम दिली गेली आणि यात आणखी कोण-कोण सामील आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
पत्नी आणि प्रियकर अटकेत
पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत मृत इरफानची पत्नी, तिचा प्रियकर करण कुमार आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
भाडोत्री मारेकरी पसार
दानापूरचे डीएसपी-२ अमरेंद्र कुमार झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. मात्र, मुख्य शूटर (गोळीबार करणारा आरोपी) अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे.
Read About : Birasane Couple Self Immolation Attempt – बिरसने दाम्पंत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.