Ad Advertisement Ad Advertisement

Senior Selection Pay Scale Training Schedule – वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर

२०० गुणांचे मूल्यमापन; उत्तीर्ण होण्यासाठी १०० गुण अनिवार्य
अपयशी शिक्षकांना पुन्हा प्रशिक्षणाची संधी

छत्रपती संभाजीनगर: Senior Selection Pay Scale Training Schedule – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक तसेच अध्यापक विद्यालयांतील अध्यापकाचार्यांसाठी वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १३ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा आणि तालुकास्तरावर आयोजित केले जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) कार्यालयाने यासंदर्भात सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा परिषद कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.

या प्रशिक्षणासाठी एकूण २०० गुणांचे मूल्यमापन निश्चित करण्यात आले असून, उत्तीर्ण होण्यासाठी किमान १०० गुण मिळवणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, मूल्यमापनाच्या दोन्ही टप्प्यांत स्वतंत्रपणे किमान २५ गुण मिळवणे बंधनकारक आहे. प्रशिक्षण सुरू असताना पहिल्या टप्प्यात १०० गुणांचे मूल्यांकन होणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित पाच स्वाध्यायांसाठी ५० गुण, तर लेखी परीक्षेसाठी ५० गुण असतील. प्रशिक्षण संपल्यानंतरच्या ४० दिवसांत दुसऱ्या टप्प्यातील १०० गुणांचे मूल्यांकन केले जाईल. यात पाच लेखी स्वाध्यायांना ५० आणि प्रकल्प अथवा संशोधन अहवालाला ५० गुण दिले जाणार आहेत. प्रत्येक स्वाध्यायात किमान पाच गुण मिळवणे आवश्यक आहे. निर्धारित गुणांची अट पूर्ण न करणाऱ्या शिक्षकांना अनुत्तीर्ण घोषित करण्यात येणार आहे. अशा शिक्षकांना नव्याने नोंदणी करून शुल्क भरल्यानंतर पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.

प्रत्येक केंद्रावर ५० ते २०० प्रशिक्षणार्थी

प्रशिक्षणाच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) प्राचार्यांकडे जिल्हास्तरावर, तर तालुकास्तरावर वरिष्ठ अधिव्याख्याता किंवा अधिव्याख्याता यांच्याकडे केंद्र समन्वयक म्हणून सोपविण्यात आली आहे. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर किमान ५० आणि कमाल २०० प्रशिक्षणार्थ्यांची व्यवस्था करता येणार आहे. आवश्यकतेनुसार केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी किंवा अध्यापकाचार्यांचीही नियुक्ती करता येणार आहे. प्रशिक्षण केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, इंटरनेट, एलसीडी प्रोजेक्टर आणि स्मार्ट क्लासरूम यांसारख्या सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित आहे. तसेच प्रत्येक वर्गात सहा ते सात प्रशिक्षणार्थ्यांचे आठ गट तयार करून दोन गटांसाठी एक सुलभक नियुक्त केला जाणार आहे.

उपस्थितीपासून गुणांकनापर्यंत ऑनलाइन नोंद

प्रशिक्षणार्थ्यांना ई-मेलद्वारे प्रशिक्षणाचे ठिकाण, तारीख आणि वेळ कळविण्यात येणार आहे. भोजन व अल्पोपहाराची व्यवस्था नसल्याचेही पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. स्वाध्यायासाठी फुलस्केप कागद व वही सोबत आणावी लागणार आहे. पूर्वचाचणी आणि उत्तरचाचणी मोबाइलवर सोडवावी लागेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि संबंधित अभ्याससाहित्याचे वाचन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. प्रशिक्षण काळातील प्रत्येक तासिकेची उपस्थिती नोंदवून पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.

प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी चाचणी घेऊन उपस्थिती प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर ४० दिवसांच्या आत पाच स्वाध्याय आणि प्रकल्प अहवाल जमा करावे लागतील. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुलभकांना दोन दिवसांसाठी गुणांकनाकरिता बोलावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, एकदा पोर्टलवर नोंदवलेले गुण पुन्हा बदलता येणार नाहीत. त्यामुळे मूल्यमापन करताना निर्धारित निकषांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर सोपविण्यात आली आहे.

जाचक नियमांविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

राज्यातील निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणादरम्यान राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) कडून लागू करण्यात आलेल्या जाचक नियमांविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या नियमांमुळे शिक्षकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत शिक्षक संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले आहे. प्रशिक्षणाच्या नियमांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रशिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाकडून दोन हजार रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, प्रशिक्षणादरम्यान आजारपण, अपघात, कुटुंबातील व्यक्तीचे निधन किंवा प्रसूती यांसारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याने शिक्षकाला एक-दोन दिवस उपस्थित राहता आले नाही, तर त्याला अपात्र ठरवले जाते. परिणामी, भरलेले दोन हजार रुपये वाया जातात. पुन्हा प्रशिक्षणासाठी नोंदणी करताना नव्याने दोन हजार रुपये भरावे लागतात. ही बाब अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Read About : Teacher Issues Pavitra Portal – पवित्र पोर्टलचा पेच, रिक्त जागा अन् जुनी पेन्शन
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.