Ad Advertisement Ad Advertisement

SEBI Investor Camp 2026 – गुंतवणूकदारांच्या प्रलंबित तक्रारींचा करणार निपटारा

१७ नोव्हेंबर रोजी सेबी, आयईपीएफएतर्फे ‘निवेशक शिबिर’
रखडलेले लाभांश, केवायसी आणि शेअर्सच्या हस्तांतरणाचे प्रश्न सुटणार

नवी दिल्ली : SEBI Investor Camp 2026 शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे प्रलंबित दावे, रखडलेले लाभांश आणि केवायसीसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) आणि गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफए) यांच्या संयुक्त विद्यमाने १७ नोव्हेंबरला नवी दिल्लीत आठवे ‘निवेशक शिबिर’ आयोजित करण्यात येणार आहे.


सेबीने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बाजाराशी संबंधित विविध संस्थांच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे. यात बीएसई, एनएसई, सीडीएसएल आणि एनएसडीएल या बाजार पायाभूत सुविधा संस्थांसह केफिन टेक्नॉलॉजीज, एमयूएफजी इंटाइम इंडिया, बिगशेअर सर्व्हिसेस, डेटामॅटिक्स बिझनेस सोल्युशन्स आणि पूर्वा शेअरजिस्ट्री इंडिया आदी रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजंट सहभागी होणार आहेत.


हे शिबिर १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत नवी दिल्लीतील लोधी रोडवरील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या जकारांडा हॉलमध्ये होणार आहे. वर्धमान मार्गावरील प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून सहभागी होता येईल. शिबिरात येणाऱ्या भागधारकांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना यांसारखे शासकीय ओळखपत्र सोबत आणावे, असे आवाहन सेबीने केले आहे.


यासाठी ग्राहक नोंदणी आणि केवायसी प्रक्रियेत ‘एईओआय’ (स्वयंचलित माहिती विनिमय) अहवाल व आवश्यक पडताळणीच्या तरतुदींचा समावेश करण्यास सेबीने सांगितले आहे. १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या प्रारि कायदा २०२५ आणि प्रारि नियम २०२६ यांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत.

सात वर्षांपर्यंतचा लाभांश मिळविण्यास मदत

या शिबिरात गुंतवणूकदारांना सात वर्षांपर्यंतचा दावा न केलेला लाभांश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, केवायसी आणि नामनिर्देशन (नॉमिनेशन) प्रक्रियेतील त्रुटी दूर करणे, वारसाहक्काने शेअर्स हस्तांतरित करताना येणाऱ्या अडचणी सोडविणे आणि प्रलंबित दाव्यांचा निपटारा करणे यावर भर दिला जाणार आहे. आयईपीएफएकडे प्रलंबित असलेले दावा न केलेले शेअर्स आणि न मिळालेले लाभांश यासंदर्भातील दावे निकाली काढण्यासाठीही गुंतवणूकदारांना मदत केली जाईल. याशिवाय, शेअर प्रमाणपत्र हरविले असल्यास त्याऐवजी दुय्यम प्रमाणपत्र (डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट) मिळविण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे.

Read About : NPCI UPI Merchant Incentive Scheme – यूपीआय व्यवहारांवर मिळणार आर्थिक लाभ

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.