राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाची सार्वजनिक सूचना
छत्रपती संभाजीनगर: Electropathy Practitioners Homeopathy Doctor Title Ban – इलेक्ट्रोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन स्वतंत्र उपचारपद्धती असून इलेक्ट्रोपॅथीचा होमिओपॅथीशी कोणताही शाखात्मक किंवा विशेष उपचारपद्धतीचा संबंध नाही, असे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने (एनसीएच) दिले आहे. यासंदर्भात आयोगाने १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सार्वजनिक सूचना जारी केली आहे.
इलेक्ट्रोपॅथी आणि होमिओपॅथी यांना एकाच वैद्यकीय पद्धतीचा भाग समजले जात असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले होते. यामुळे सर्वसामान्य नागरिक, वैद्यकीय व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे आयोगाने नमूद केले आहे. आयोगाने जारी केलेल्या सूचनेनुसार, कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला इलेक्ट्रोपॅथी ही होमिओपॅथीची शाखा, विशेष शाखा किंवा उपप्रकार असल्याचे सांगता अथवा जाहिरात करता येणार नाही. तसेच इलेक्ट्रोपॅथीचा अभ्यास करणाऱ्या व्यावसायिकांना पात्र व नोंदणीकृत होमिओपॅथी डॉक्टरांसाठी राखीव असलेली व्यावसायिक पदवी, पदनाम, उपाधी किंवा वैधानिक नोंदणीचा तपशील वापरता येणार नाही.
इलेक्ट्रोपॅथीशी संबंधित शैक्षणिक केंद्रे, दवाखाने आणि अन्य संस्थांनी आपल्या फलकांवर, जाहिरातींमध्ये तसेच प्रसिद्धी साहित्यामध्ये कोणती उपचारपद्धती शिकवली जाते किंवा वापरली जाते, याचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असल्याचेही आयोगाने निर्देशित केले आहे. नागरिकांची दिशाभूल होऊ नये आणि दोन्ही उपचारपद्धतींमधील फरक स्पष्ट राहावा, हा या सूचनेमागील उद्देश आहे.
सर्व संबंधित संस्था, व्यावसायिक आणि घटकांनी या सूचनेची दखल घेऊन लागू कायदे व नियमांनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन आयोगाने केले आहे. सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने ही सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली आहे.
Read About : Sans Campaign Pneumonia Prevention -चिमुकल्यांचा श्वास वाचविण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला – 2026
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.