वैनगंगा नदीकिनारी मित्रासोबत गेल्या होत्या फिरायला
नागपूर : IndiGo Air Hostess Murder पुणे येथील ३५ वर्षांच्या इंडिगोच्या एअर होस्टेस वर्षा तुरकर (Varsha Turkar) यांची पाठीत धारदार शस्त्राने चार वार करून हत्या करण्यात आली. त्या दिवाळीसाठी पुण्याहून बालाघाटमधील त्यांच्या किन्ही गावात आल्या होत्या. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील बोंडराणी गावात वैनगंगा नदीच्या काठावर सायंकाळी ७ वाजता घडली, जेव्हा त्या त्यांचा मित्र रितेशसोबत फिरायला बाहेर गेल्या होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोराने वर्षा (Varsha) यांच्या पाठीत चार वार केले. हल्ला इतका गंभीर होता की घटनास्थळीच त्यांची प्रकृती खालावली. हा खून दरोड्याचा प्रकारातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तुरकर (Turkar) या पुणे येथे राहत होत्या. दिवाळीसाठी त्या अडीच वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन माहेरी आल्या होत्या. त्यांचे माहेर बालाघाट जिल्ह्यातील किन्ही आहे. १४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी त्या गोंदिया येथील त्यांचा मित्र रितेश अग्रवालसोबत बोंडराणी गावात गेल्या होत्या. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते दोघे वैनगंगा नदीच्या काठाजवळ होते. घटनेनंतर लगेच रितेशने वर्षा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि मेहुणे अश्विनी पटेल यांना फोन करून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच कुटुंबीय तत्काळ घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी वर्षा यांना उपचारासाठी खैरलांजी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई सुरू केली. पोलीस पथके या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी सध्या मृताचा मित्र रितेश अग्रवाल याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.
मित्राला कोणत्याही प्रकारे इजा नाही
वर्षा यांच्या मित्राने कुटुंबीयांना घटनास्थळी काही बुरखाधाऱ्यांनी लुटपाट करून तिच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. मात्र, मित्राला कोणत्याही प्रकारे इजा झालेली नाही. यामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. घटनेची माहिती मिळताच खैरलांजी पोलीस, वाराशिवनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अनुप उईके आणि कटंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास सिंह घटनास्थळी पोहोचले. शवविच्छेदनानंतर महाराष्ट्र पोलिसांना तपासाची कागदपत्रे सुपूर्द केली जाणार आहेत. पुढील तपास गोंदिया-दवनीवाडा पोलीस करत आहेत.
२०२४ मध्ये झाले होते लग्न
वर्षा यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे लग्न २०२४ मध्ये झाले होते. त्यांचा पती इंदूर येथे राहतो. त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. वर्षा पुणे विमानतळावर इंडिगो कंपनीत नोकरी करीत होत्या. दिवाळीनिमित्त त्या आपल्या मुलीसह माहेरी आल्या होत्या. वर्षा यांच्या हत्येमागील खरा हेतू अद्याप अस्पष्ट आहे. शिवाय, गुन्हेगारांबाबत पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती उघड केलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली.
Read About : CBI raids in Mahadev betting app case- महादेव ॲप : सीबीआयचे 6 राज्यांत 33 ठिकाणी छापे
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.