एआय आधारित ARTEX फ्रेमवर्कचा गैरवापर करून तीन तासांपेक्षा कमी वेळात सिस्टीमवर विशेष ताबा; वित्त, संरक्षण, ऊर्जा आणि आरोग्य क्षेत्रांना लक्ष्य
वॉशिंग्टन : AI Cyber Attacks जगभरातील संस्थांवर सायबर हल्ले अधिक वेगवान करण्यासाठी सायबर गुन्हेगार एआय आधारित सुरक्षा चाचणी टूल्सचा वापर करत आहेत, असा गंभीर इशारा अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने दिला आहे. यातील काही हल्ल्यांमध्ये गुन्हेगार अवघ्या तीन तासांपेक्षा कमी वेळात सिस्टीमचा प्रिव्हिलेज्ड ॲक्सेस (विशेष ताबा) मिळवत असल्याचे समोर आले आहे.
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यापासून हल्लेखोरांनी एआरटीईएक्स नावाच्या एका ओपन-सोर्स फ्रेमवर्कचा वापर सुरू केला आहे. या माध्यमातून त्यांनी वित्त, सरकार, तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा आणि आरोग्य सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील संस्थांना लक्ष्य केले आहे. हे टूल संभाव्य लक्ष्यांची ओळख पटवण्यापासून ते डेटा चोरीची तयारी करण्यापर्यंतचे घुसखोरीचे अनेक टप्पे स्वयंचलित (ऑटोमेट) करू शकते. यामुळे सायबर सुरक्षा यंत्रणांना हल्ल्याचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळत आहे.
हल्लेखोर एकाच वेळी अनेक संस्थांना करतात लक्ष्य
मूळत: हे फ्रेमवर्क अधिकृत सुरक्षा चाचणीसाठी तयार करण्यात आले होते. मात्र, त्याच्या गैरवापराच्या बातम्या समोर आल्यानंतर ऑक्टोबरमध्ये डेव्हलपरने मूळ ऑनलाइन रिपॉझिटरी हटवली. तरीही, या टूलचे इतर व्हर्जन आणि प्रती अद्याप इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या टूलमुळे तांत्रिक अडचणी कमी झाल्या असून, हल्लेखोर एकाच वेळी अनेक संस्थांना लक्ष्य करू शकत आहेत. यामध्ये इंटरनेटशी जोडलेले ॲप्लिकेशन्स, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुरवठादार किंवा भागीदारांच्या सिस्टीमचा प्रामुख्याने समावेश आहे.
या धोक्याची तीव्रता स्पष्ट करताना एफबीआयने दक्षिण कोरियातील वित्तीय संस्थांवर झालेल्या हल्ल्यांचे उदाहरण दिले आहे. आर्थिक फायद्यासाठी केलेल्या या हल्ल्यांमध्ये सुमारे ६७,००० लोकांची वैयक्तिक माहिती चोरीला गेली. याशिवाय, एका सप्लाय-चेन कॉम्प्रोमाइजमुळे क्लाउड बॅकअप सेवेचा वापर करणाऱ्या २,२५० हून अधिक ग्राहकांच्या सिस्टीमपर्यंत हल्लेखोरांना प्रवेश मिळाल्याचेही उघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, सर्व संस्थांनी इंटरनेटवरील आपल्या सुरक्षिततेचा आढावा घ्यावा, ओळख आणि ॲक्सेस कंट्रोल मजबूत करावेत, तसेच कोणत्याही संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवून लॉगिन माहिती सुरक्षित ठेवावी, असे आवाहन एफबीआयने केले आहे.
Read About : Chhatrapati Sambhajinagar Burglary – 6 वाजता कुटुंबीय हैदराबादला गेले अन् 9 वाजता चोराने फ्लॅट फोडला!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.