Ad Advertisement Ad Advertisement

Common Neural Code – चेहरा आणि आवाजातील भावना ओळखण्यासाठी मेंदू वापरतो एकच न्यूरल कोड; संशोधनातून महत्त्वाचा खुलासा

चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाजातील आनंद, दुःख, भीती ओळखण्याची मेंदूची प्रक्रिया समान असल्याचे स्पष्ट

लिस्बन : Common Neural Code समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहून किंवा तिचा आवाज ऐकून तिच्या मनातील भावना ओळखणे मानवी संवादासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा समज होता की, चेहरा आणि आवाज ओळखण्यासाठी मेंदूचे वेगवेगळे भाग स्वतंत्रपणे काम करतात. मात्र, बेल्जियम आणि पोर्तुगालमधील संशोधकांनी केलेल्या ताज्या अभ्यासानुसार, चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाजातील भावना ओळखण्यासाठी मेंदू एकाच सामायिक संकेताचा म्हणजेच कॉमन न्यूरल कोडचा वापर करतो.

कसे झाले संशोधन?

गेंट विद्यापीठाच्या न्यूरोसायंटिस्ट स्टेफानिया मॅटिओनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २४ सहभागींवर फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग स्कॅनिंगच्या मदतीने हा प्रयोग केला. या सहभागींना आनंद, दु:ख, तिरस्कार आणि भीती या चार भावना दर्शवणारे अभिनेत्यांचे चेहरे आणि आवाज एकत्रितपणे व स्वतंत्रपणे दाखवले गेले. मेंदूतील चेहरा ओळखणारा भाग आणि आवाज ओळखणारा भाग यामध्ये होणाऱ्या हालचालींचा अभ्यास एका विशेष अल्गोरिदमद्वारे करण्यात आला.

मेंदूच्या भागांमधील समन्वय

संशोधनात दिसून आले की, भावनांशी संबंधित माहिती मेंदूच्या पारंपरिक मर्यादा ओलांडून एका भागातून दुसऱ्या भागात जाते. उदाहरणार्थ, चेहरा ओळखणाऱ्या भागातील मेंदूच्या हालचालींवरून अल्गोरिदमने आवाजातील भावनाही अचूक ओळखल्या. याशिवाय, टेम्पोरल व्हॉइस एरिया, पोस्टीरियर सुपीरियर टेम्पोरल सल्कस आणि प्रीसेंट्रल गायरस या तीन भागांत पाहून किंवा ऐकून समजणाऱ्या भावनांवर समान पद्धतीने प्रक्रिया होते.

संशोधनाचे महत्त्व आणि मर्यादा

या निष्कर्षामुळे मेंदूच्या कार्यप्रणालीबद्दलच्या जुन्या संकल्पनांना छेद मिळाला आहे. मेंदूतील विशिष्ट भाग केवळ ओळख पटवण्यापुरते मर्यादित नसून ते सतत बदलणाऱ्या भावनांचीही नोंद ठेवतात. या अभ्यासातील सहभागींची संख्या मर्यादित (२४) असली आणि स्कॅनरच्या मर्यादेमुळे अमिग्डाला भागाचा अभ्यास करता आला नसला, तरी भावना समजून घेण्याची मेंदूची यंत्रणा ही एक सांघिक प्रक्रिया असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

Read About : Sans Campaign Pneumonia Prevention -चिमुकल्यांचा श्वास वाचविण्यासाठी आरोग्य विभाग सरसावला – 2026
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.