Ad Advertisement Ad Advertisement

Early Bedtime for Prediabetes – प्री-डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी रात्री लवकर झोपा

झोपेचा कालावधी समान असला तरी झोपण्याच्या वेळेचा वजन नियंत्रणावर परिणाम शक्य; लवकर झोपणाऱ्यांमध्ये वजन घटण्याशी संबंध

नवी दिल्ली : Early Bedtime for Prediabetes मधूमेहपूर्व (प्री-डायबिटीज) त्रास असलेल्या व्यक्तींनी रात्री लवकर झोपण्याची सवय लावल्यास वजन कमी करण्यास मदत होऊ शकते, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, झोपेचा कालावधी समान असला तरी झोपण्याची वेळ वजन नियंत्रणावर परिणाम करू शकते. न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष ‘नर्सिंग रिसर्च’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

या अभ्यासात २१ ते ६४ वयोगटातील १९६ मधूमेहपूर्व रुग्णांचा समावेश होता. हे सर्वजण दररोज साडेसहा तासांपेक्षा कमी झोपत होते. सहभागी व्यक्तींचे दोन गट करण्यात आले. दोन्ही गटांना आरोग्यदायी आहार, व्यायाम आणि तणाव व्यवस्थापनाचे मार्गदर्शन देण्यात आले. एका गटाला याशिवाय झोपेच्या सवयी सुधारण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यात झोपण्याची वेळ हळूहळू लवकर करण्यावर भर होता.

लवकर झोपल्यास वजन घटण्यास मदत

दोन्ही गटांतील व्यक्तींच्या झोपेत आणि वजनात सुधारणा दिसली. मात्र, झोपेसाठी विशेष मार्गदर्शन घेतलेल्या गटात झोपेची गुणवत्ता आणि दिवसा जाणवणारी झोपाळूपणाची समस्या अधिक सुधारली. सर्व सहभागींच्या आकडेवारीनुसार, झोपण्याची वेळ प्रत्येक एक तासाने लवकर केल्यास आठ आठवड्यांत सरासरी ०.६ किलो अधिक वजन घटण्याशी संबंध आढळला.

रक्तातील साखरेत मात्र बदल नाही

लवकर झोपल्यामुळे रात्री उशिरा खाण्याची सवय कमी होऊ शकते. तसेच शरीराच्या चयापचयाच्या नैसर्गिक चक्राशी खाण्याच्या वेळा जुळण्यास मदत होऊ शकते, असे संशोधकांचे मत आहे. कृत्रिम प्रकाशाचा कमी संपर्क आणि भुकेशी संबंधित हार्मोन्समधील बदलही संभाव्य कारणे असू शकतात. मात्र, या अभ्यासात रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत लक्षणीय बदल आढळला नाही. त्यामुळे लवकर झोपणे हा वजन नियंत्रणासाठी पूरक उपाय ठरू शकतो; पण प्री-डायबिटीजवरील उपचार, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांची जागा घेऊ शकत नाही.

Read About : Cyberbullying among students worldwide – जगभरातील दहापैकी 1 विद्यार्थ्याला सायबर बुलिंगचा फटका
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.