देगलूरमधील घटना; अपघातानंतर कारचालक पसार
देगलूर Degloor Car Accident : भरधाव वेगाने आलेल्या होंडा सिटी कारने थेट साईबाबा मशिनरी दुकानात घुसून तेथे मजुरीचे काम करणाऱ्या ६८ वर्षीय ज्येष्ठ कामगाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दिगंबर निवृत्ती दबडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. सोमवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील साईबाबा मशिनरी दुकानात ही घटना घडली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होंडा सिटी कारच्या (क्र. एम एच ०६. एएल १८९८) चालकाने भरधाव वेगाने व हयगयीने वाहन चालवून शहरातील साईबाबा मशिनरी दुकानाला धडक दिली. त्यावेळी दुकानात मजुरीचे काम करीत असलेले दिगंबर निवृत्ती दबडे (वय ६८, रा. साईनगर, भायेगाव रोड, देगलूर) यांना कारची जोरदार धडक बसली त्यामुळे रूग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या धडकेत त्यांच्या डोक्याला, मानेला तसेच दोन्ही हातांना व पायांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात विठ्ठल मारोती येशीनवाड आणि दिलीप निलमवार हे दोघेही गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी मयताचा मुलगा उमाकांत दिगंबर दबडे (वय ५०, रा. चिंचगाव, ता. मुखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा (क्रमांक ५४९/२०२६) भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ व १७७ नुसार सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवार यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. के. मोरे करीत आहेत. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या दिगंबर निवृत्ती दबडे यांच्या पार्थिवावर देगलूर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी परदेशी यांनी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी सायंकाळच्या सुमारास पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती जमादार साहेबराव सगरोळीकर यांनी दिली.
धावत्या कारने पेट घेतल्याने खळबळ
जालना : इंदूर (मध्यप्रदेश) येथून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना फोर्ड आयकॉन कारने (क्र. एमपी. – १९ सीए – ९१९६) अचानक पेट घेतल्याने चालकाने तातडीने गाडी जागेवरच थांबवून परिसरातील नागरीकांना घटनेची माहिती दिली. नागरीकांनी अग्निशमन दलाला माहिती कळविल्यानंतर अवघ्या सहा मिनीटात बंब दाखल झाला.
प्रसंगावधान राखत बचावले
परंतू तोपर्यंत कार पूर्णपणे जळाली होती. तरीही धावत्या कारमध्ये आग लागली त्यावेळी दोघे होते, वेळेचे प्रसंगावधान राखत दोघे बालबाल बचावले आहे. अनिल सिताराम कुमार व सोबत एक महिला होती. ही घटना सोमवारी (दि.१६) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास जालना – राजुर रस्त्यावरील कनक हॉटेलजवळ घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष काळे, सादीक अली, विनायक चव्हाण यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आग विझवली. या घटनेची शहरात एकच चर्चा होत आहे.
Read About : Why Glue Does Not Stick to Bottle – डिंक स्वतःच्याच बाटलीला का चिकटत नाही? जाणून घ्या यामागचे रंजक विज्ञान
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.