Ad Advertisement Ad Advertisement

AI in Banking : एआय बँकिंग क्षेत्राचे अर्थशास्त्र बदलणार; सुरुवातीच्या टप्प्यात वापर करणाऱ्या बँकांना 3 पट परताव्याचा अंदाज

मॅकिन्झीच्या अहवालानुसार, एजेंटिक एआयमध्ये गुंतवणूक करणाऱ्या बँकांना सरासरी १० महिन्यांत खर्च वसूल करण्याची संधी; तीन वर्षांत २.९ पट परताव्याचा अंदाज

नवी दिल्ली : AI in Banking आर्टिफिशियल इंटेलिजन्स एजंट्सचा वापर करणाऱ्या बँकांना त्यांची गुंतवणूक सुमारे १० महिन्यांत परत मिळू शकते आणि पुढील तीन वर्षांत सुरुवातीच्या गुंतवणुकीच्या जवळपास तीन पट परतावा मिळू शकतो, असे प्रसिद्ध सल्लागार संस्था मॅकिन्झीच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. हे तंत्रज्ञान बँकिंग क्षेत्राचे अर्थशास्त्र आणि स्पर्धेचे चित्र पूर्णपणे बदलून टाकण्यास सक्षम असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गुंतवणुकीवर वेगवान परतावा आणि कामकाजात बदल

मॅकिन्झीच्या अहवालानुसार, बँकिंग क्षेत्रातील ५२ विविध एजंटिक एआय उपयोगांचा अभ्यास केला असता, गुंतवणूक परत मिळण्याचा सरासरी कालावधी सुमारे १० महिने इतका आहे, तर तीन वर्षांतील अंदाजित परतावा २.९ पट आहे. बँका केवळ प्रायोगिक प्रकल्पांपुरते मर्यादित न राहता किती वेगाने एआयला आपल्या दैनंदिन कामकाजात, उत्पादनांमध्ये आणि ग्राहक सेवेत समाविष्ट करतात, यावर त्यांचे यश अवलंबून असेल. एआयमुळे कामाचा खर्च, बँक व ग्राहक यांच्यातील संवाद आणि ग्राहकांच्या निवडीच्या पद्धती बदलत असल्याने बँकिंगचे अर्थशास्त्र वर्षांऐवजी काही तिमाहींमध्येच बदलू शकते, असे अहवालात म्हटले आहे.

उत्पादकता वाढली, पण नफ्यावर मर्यादित परिणाम

कार्यक्षमतेत होणारी वाढ आपोआप मोठ्या नफ्यात रूपांतरित होतेच असे नाही, असा इशाराही अहवालात दिला आहे. मॅकिन्झीच्या २०२६ स्टेट ऑफ एआय सर्वेक्षणात ८० टक्के प्रतिसादकर्त्यांनी एआयमुळे वैयक्तिक उत्पादकता वाढल्याचे मान्य केले, परंतु केवळ ६ टक्के लोकांनीच आपल्या एकूण नफ्यात या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.

ग्राहकांच्या सवयींमध्येही मोठा बदल

१३ देशांतील सुमारे ४६,००० ग्राहकांच्या सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, २३ टक्के ग्राहक बँकिंगशी संबंधित कामांसाठी आधीच जनरेटिव्ह एआयचा वापर करत आहेत. यातील ७४ टक्के ग्राहक चॅटजीपीटी, क्लॉड किंवा जेमिनी यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहेत.

वाढता खर्च आणि सायबर सुरक्षेचा धोका

अहवालात वाढत्या खर्चाकडे आणि सुरक्षा धोक्यांकडेही लक्ष वेधले आहे. एआय टोकन्स, कॉम्प्युटिंग आणि संचालनावरील खर्च एकूण कामगार खर्चाच्या २० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. याशिवाय, २०२५ मध्ये एफबीआयने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, एआय-आधारित गुन्ह्यांमुळे सुमारे ९० कोटी अमेरिकन डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

Read About: JSW Motors Chhatrapati Sambhajinagar Plant जेएसडब्ल्यू मोटर्सची मोठी झेप; 50 हून अधिक कंपन्यांसोबत भागीदारी

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.