Ad Advertisement Ad Advertisement

New Monkey Species in Amazon : ॲमेझॉनच्या जंगलात माकडांच्या दोन नव्या प्रजातींचा शोध; दोन्ही नामशेष होण्याच्या धोक्यात

युनिव्हर्सिटी ऑफ सॅलफोर्ड आणि ब्राझीलच्या संशोधकांचे संशोधन; ८५ वर्षांनंतर हाउलर माकडांच्या नव्या प्रजातींची नोंद

सॅलफोर्ड (ब्रिटन) : New Monkey Species in Amazon दक्षिण अमेरिकेतील जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय जंगल असलेल्या ॲमेझॉनमध्ये शास्त्रज्ञांनी हाउलर माकडांच्या दोन नवीन आणि अत्यंत आकर्षक प्रजातींचा शोध लावला आहे. तब्बल ८५ वर्षांनंतर हाउलर माकडांच्या नव्या प्रजातींची अधिकृत नोंद झाली आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ सॅलफोर्ड आणि ब्राझीलमधील संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय पथकाने हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.

शास्त्रज्ञांनी दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ११ हाउलर माकडांच्या प्रजातींच्या जनुकीय डेटाचे आणि संग्रहालयातील नमुन्यांचे सखोल विश्लेषण केले. यातून पँटेपुई रेड हाउलर आणि माटो ग्रोसो रेड हाउलर या दोन स्वतंत्र प्रजाती अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले. घनदाट दाढी, विलोभनीय चेहरे आणि चमकदार लालसर-सोनेरी केसांमुळे ही माकडे अत्यंत आकर्षक दिसतात. ॲमेझॉन, ब्रँको आणि झिंगू यांसारख्या विशाल नद्यांनी लाखो वर्षे नैसर्गिक अडथळ्याचे काम केल्यामुळे या माकडांचे गट वेगळे होऊन स्वतंत्र प्रजाती म्हणून उत्क्रांत झाले.

या नव्या शोधामुळे जगभरातील ज्ञात हाउलर माकडांच्या प्रजातींची संख्या १६ झाली आहे. मात्र, हा आनंद व्यक्त करत असतानाच शास्त्रज्ञांनी गंभीर धोक्याचा इशाराही दिला आहे. दक्षिणेकडील ॲमेझॉनमध्ये आढळणारी माटो ग्रोसो रेड हाउलर ही प्रजाती जगातील सर्वात वेगाने जंगलतोड होणाऱ्या क्षेत्रात राहते. शेतीचा विस्तार आणि अधिवास नष्ट झाल्यामुळे ही प्रजाती आधीच नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. दुसरीकडे, ब्रँको नदीवर प्रस्तावित असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे पँटेपुई रेड हाउलरच्या अस्तित्वालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.

जंगलतोडीमुळे अनेक दुर्मिळ जीव विज्ञानाला ज्ञात होण्यापूर्वीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या नव्या शोधामुळे या संवेदनशील प्रजातींच्या तातडीच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्यास मदत होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.

Read About : Cellophane Bees Natural Plastic : मधमाश्या शरीरातून तयार करतात नैसर्गिक प्लास्टिक; मातीत अवघ्या काही महिन्यांत होते विघटन
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.