Ad Advertisement Ad Advertisement

China Space Military Capabilities – अमेरिकेच्या अंतराळ प्रभुत्वाला चीनचा धक्का

अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेच्या १४० पानी अहवालात चीनच्या उपग्रह क्षमता, उपग्रहविरोधी शस्त्रे आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देखरेखीच्या क्षमतेवर प्रकाश

हाँगकाँग / वॉशिंग्टन : China Space Military Capabilities युक्रेन युद्धाने युद्धभूमीवर अंतराळ क्षेत्राचे महत्त्व किती निर्णायक आहे हे जगाला दाखवून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेने (डिफेन्स इंटेलिजन्स एजंसी – डीआयए) आपल्या ताज्या १४० पानांच्या ‘चॅलेंजेस टू सिक्युरिटी इन स्पेस २०२६’ या अहवालात अत्यंत खळबळजनक आणि गंभीर खुलासे केले आहेत. त्यानुसार अंतराळ क्षेत्रातील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यात चीन हा सर्वात मोठा आणि धोकादायक प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आला आहे.

चीन, रशिया, इराण आणि उत्तर कोरिया हे चार देश (क्रिन्क) अमेरिका आणि त्याच्या मित्रांच्या अंतराळ उपग्रहांना क्षेपणास्त्रे, लेझर, जॅमर्स आणि सायबर हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त किंवा निकामी करण्याची क्षमता वेगाने वाढवत आहेत. अमेरिकेत नासा ही नागरी संस्था लष्करापासून वेगळी आहे, परंतु चीनचा संपूर्ण अंतराळ कार्यक्रम थेट पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) आणि मध्यवर्ती लष्करी आयोगाच्या (सीएमसी) पूर्ण नियंत्रणाखाली चालवला जातो.

उपग्रह प्रक्षेपण आणि क्षमतेत प्रचंड वाढ

२०१६ मध्ये चीनने २२ प्रक्षेपणे केली होती, ती संख्या २०२५ पर्यंत ९३ प्रक्षेपणांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. चीनचे आयएसआर (गुप्तचर, देखरेख आणि रेकी) उपग्रह २०१८ मधील संख्येपेक्षा तिप्पट होऊन ५१० पेक्षा जास्त झाले आहेत. चीनचा ‘बेईडू’ सॅटेलाइट नेव्हिगेशन प्रणालीचा वापर सध्या जागतिक स्तरावर २ अब्जांपेक्षा जास्त नागरिक आणि लष्करी यंत्रणा करत आहेत.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर २४ तास नजर

चीनची लो-अर्थ ऑर्बिट (एलईओ) उपग्रह मालिका जगातील कोणत्याही भागाचे फोटो दर ३० मिनिटांनी मिळवू शकते, तर जिओस्टेशनरी (जीईओ) उपग्रह विना-विलंब प्रत्यक्ष हालचाली पाहू शकतात. यामुळे हिंद महासागरातील आणि इंडो-पॅसिफिकमधील अमेरिकी युद्धनौका व विमानांचा ठावठिकाणा चीन सहज ठेवू शकतो.

उपग्रहविरोधी आणि लेझर शस्त्रे

चीन जमिनीवरून उपग्रह नष्ट करणारी क्षेपणास्त्रे (एसॅट), अंतराळातील इतर उपग्रहांना नष्ट करू शकणारे ‘टॉन्गक्सिन जिशू शियान’ मालिका उपग्रह तसेच उपग्रहांचे सेन्सर्स निकामी करणारी जमिनवरील शस्त्रे वेगाने तैनात करत आहे.
अमेरिकी गुप्तचर अहवालानुसार, चीन अंतराळातील शस्त्रांकडे युद्ध न करता किंवा युद्ध सुरू होण्यापूर्वीच प्रतिस्पर्ध्याला घाबरवण्यासाठी एक नियंत्रित पर्याय म्हणून पाहतो. तैवानवर हल्ला किंवा आक्रमणाची वेळ आल्यास, अमेरिकेला हस्तक्षेपापासून रोखण्यासाठी चीन आपल्या अंतराळ शस्त्रांचा वापर करून अमेरिकी दळणवळण आणि नेव्हिगेशन यंत्रणा ठप्प करू शकतो. थोडक्यात सांगायचे तर, आगामी काळात अंतराळ हे केवळ संशोधनाचे केंद्र न राहता युद्ध जिंकण्यासाठीचे सर्वात महत्त्वाचे रणांगण ठरणार आहे, जिथे चीन अमेरिकेला मागे टाकण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरला आहे.

Read About : AI Cheating in Exams : एआयच्या माध्यमातून होणारी कॉपी रोखण्यासाठी दक्षिण कोरियाची मोठी तयारी; संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.