Ad Advertisement Ad Advertisement

National Newborn Week 2026 – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहाला उत्साहात सुरुवात

अकाली व कमी वजनाच्या बालकांच्या आरोग्य तपासणीवर विशेष भर!

छत्रपती संभाजीनगर : National Newborn Week 2026 – नवजात बालकांचे आरोग्य, सुरक्षित संगोपन आणि सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने १५ ते २१ नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात या सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली असून, अकाली जन्मलेली, कमी वजनाची आणि उच्च जोखमीच्या नवजात बालकांच्या आरोग्य तपासणीसह नियमित पाठपुरावा सेवांवर विशेष भर दिला जात आहे.

यंदाच्या सप्ताहाची संकल्पना ‘लहान बाळे, मोठी क्षमता; त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’ अशी आहे. नवजात बालकांच्या आयुष्यातील पहिले काही दिवस आणि महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याने या काळात योग्य पोषण, वेळेवर उपचार, नियमित आरोग्य तपासणी आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

या सप्ताहादरम्यान एसएनसीयू, एनआयसीयू, एमएनसीयू आणि एनबीएसयू मधून उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या नवजात बालकांची यादी तयार करून त्यांचा नियमित पाठपुरावा केला जात आहे. विशेषत: अकाली जन्मलेली, कमी वजनाची आणि उच्च जोखमीच्या बालकांना प्राधान्य दिले जात आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षित संगोपनाबाबत जनजागृती व समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. नवजात बालकांना जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ स्तनपान देणे, कमी वजनाच्या बालकांसाठी कांगारू मदर केअर (केएमसी), नियमित लसीकरण, स्वच्छता आणि योग्य पोषण याबाबत मातांना मार्गदर्शन केले जात आहे.

विकासात्मक मूल्यांकनावरही विशेष लक्ष

आशा स्वयंसेविका, एएनएम आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून उच्च जोखमीच्या बालकांना गृहभेटी देऊन वजन, स्तनपान, लसीकरण आणि वाढ-विकासाचा आढावा घेतला जात आहे. तसेच अकाली जन्मलेल्या बालकांची डोळ्यांची आरओपी तपासणी, श्रवण तपासणी आणि विकासात्मक मूल्यांकनावरही विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान, नवजात बालक दूध पीत नसल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, शरीर थंड पडल्यास, ताप आल्यास, हालचाली कमी झाल्यास किंवा आकडी आल्यास पालकांनी तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेत दाखल करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Read About : London Experts Cancer Surgeries – लंडनच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घाटीत तीन मोठ्या शस्त्रक्रिया
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.