Ad Advertisement Ad Advertisement

Paithan Fisherwomen Protest – मच्छीमार महिलांचे मुलाबाळांसह गोदापात्रात आंदोलन

एका महिलेला वाचविण्यात यश: पर्यायी व्यवस्था होईपर्यंत घाटाचे काम बंद करण्याची मागणी

पैठण Paithan Fisherwomen Protest : गोदावरी काठावरील घाटाच्या बांधकामामुळे संसार उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत मच्छीमार कहार समाजातील महिलांनी लहान मुलांबाळांसह गोदावरी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. मंगळवारी(दि.१७) झालेल्या या आंदोलनादरम्यान विमल प्रभाकर गव्हाणे ही महिला पाण्यात बुडत असताना प्रशासनाने तिला वाचविले. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत घाटाचे काम बंद ठेवावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

पैठण येथील गणेश घाट परिसरात मच्छीमार समाजातील १० ते १५ कुटुंबे गेल्या ६० ते ७० वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मासेमारी आणि भाजीपाला विक्रीतून या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, घाट बांधकामासाठी सहा महिन्यांपूर्वी गागाभट्ट चौक परिसरातील नदीकाठची घरे बुलडोझरने हटविण्यात आल्याने कुटुंबे बेघर झाली. तसेच कच्ची घरे आणि उभी पिके जेसीबीने उद्ध्वस्त केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

पर्यायी निवासव्यवस्था आणि नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी संबंधित कुटुंबे वर्षभरापासून शासनदरबारी पाठपुरावा करीत आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली होती. मात्र, अद्याप प्रश्न मार्गी न लागल्याने महिलांनी जलसमाधी आंदोलन केले. आंदोलनस्थळी नायब तहसीलदार सतीश पेंडसे, मंडळ अधिकारी कल्पना शेळके, तलाठी झिरपे, अमोल ढोले तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक मुपेड, उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर आणि फौजदार रियाज शेख यांच्यासह पोलीस बंदोबस्त तैनात होता.

२० रोजी तहसील कार्यालयात बैठक

तहसील प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

Read About : MS Dhoni IPL Retirement – ‘एमएस धोनीशिवाय चेन्नई सुपर किंग्स नाही’; 19 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.