Gadchiroli Development : एखाद्या प्रदेशाचे भाग्य बदलते, तेव्हा केवळ तेथील परिस्थिती बदलत नाही, तर त्या भूमीतील माणसांच्या डोळ्यांत भविष्याची नवी स्वप्ने तरळू लागतात. विकासाच्या वाटेवर धावण्याची उमेद निर्माण होते आणि आपल्या मातीतच उज्ज्वल भविष्य घडविण्याचा आत्मविश्वास बळावतो. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरील गडचिरोली जिल्ह्यात सांप्रत अशाच परिवर्तनाची चाहूल लागली आहे. चार दशकांहून अधिक काळ नक्षलवादाच्या सावटाखाली राहिलेल्या या जिल्ह्याच्या वाट्याला आता विकासाचे नवे पर्व येत आहे. विपुल वनसंपदा, अमाप खनिजसाठे आणि कष्टाळू आदिवासी बांधवांचे सामर्थ्य लाभलेल्या या भूमीला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयासांना नवी दिशा मिळत आहे.
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोलीत पार पडलेला राष्ट्रीय जनजातीय गौरव दिनाचा सोहळा या नव्या पर्वाची आश्वासक नांदीच ठरला आहे! या सोहळ्याच्या निमित्ताने गडचिरोली देशाच्या विकासाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलेले मार्गदर्शन, देशभरातील सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या २४६ विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त झाल्याची दिलेली ग्वाही या परिवर्तनाच्या दिशेने पडलेली महत्त्वाची पावले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील या सोहळ्यासाठी गडचिरोलीची निवड होणे, हाच या जिल्ह्याच्या बदलत्या प्रतिमेचा आणि वाढत्या महत्त्वाचा संकेत आहे. कालपर्यंत असुरक्षिततेशी जोडली जाणारी या प्रदेशाची ओळख आता विकासाच्या नव्या संधींशी जोडली जात आहे.
गडचिरोलीच्या परिवर्तनाची चर्चा करताना येथील आदिवासी समाजाची अस्मिता आणि योगदान केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करताना स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक अस्मितेचा जो विचार मांडला, तो आजही प्रेरणादायी आहे. पंतप्रधानांनी भाषणाची सुरुवात ‘जोहार’ या पारंपरिक अभिवादनाने करून क्रांतिवीर बाबूराव शेडमाके, राघोजी भांगरे यांसारख्या आदिवासी वीरांचे स्मरण केले, ही बाब औचित्यपूर्ण आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून ते जल, जंगल आणि जमिनीच्या संवर्धनापर्यंत आदिवासी समाजाचे योगदान मोलाचे राहिले आहे. त्यामुळे या समाजाकडे केवळ शासकीय योजनांचा लाभार्थी म्हणून न पाहता, राष्ट्राच्या विकासप्रक्रियेतील समान भागीदार म्हणून पाहणे आवश्यक आहे.
गत काही वर्षांत गडचिरोलीतील परिस्थितीत झालेला बदल हा सुरक्षा आणि विकास यांच्या समन्वित प्रयासांचा परिणाम आहे. नक्षलवादामुळे रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाच्या सुविधा दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यात अडथळे निर्माण झाले होते. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सातत्यपूर्ण मोहिमांमुळे हिंसक कारवायांना आळा बसत असतानाच प्रशासनाने विकासकामांचा वेग वाढविला. रस्त्यांचे जाळे, शैक्षणिक सुविधा, आरोग्यसेवा आणि शासकीय योजनांचा विस्तार यामुळे दुर्गम भागातील नागरिक आणि प्रशासन यांच्यातील अंतर कमी होत आहे. बंदुकीच्या धाकापेक्षा विकासाच्या संधी अधिक सामर्थ्यवान असतात, याचा प्रत्यय या परिवर्तनातून येतो. माओवादमुक्ती हा अंतिम विजय नसून शांतता आणि लोकशाहीवरील विश्वास कायमस्वरूपी दृढ करण्याची ती सुरुवात आहे.
गडचिरोलीच्या भवितव्याच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येथील औद्योगिक क्षमतेचा नियोजनबद्ध वापर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला देशाची आगामी ‘स्टील सिटी’ म्हणून विकसित करण्याचा व्यक्त केलेला संकल्प महत्त्वाचा आहे. लोहखनिजासह विविध खनिज संपत्तीचे विपुल साठे या जिल्ह्यात आहेत. मात्र, त्यांचा अपेक्षित लाभ स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळालेला नाही. आता या संपत्तीवर आधारित पोलाद प्रकल्प, पूरक उद्योग आणि पायाभूत सुविधा विकसित झाल्यास गडचिरोलीच्या अर्थकारणाला नवी गती मिळू शकते. स्थानिक तरुणांना रोजगारासाठी स्थलांतर करण्याऐवजी स्वत:च्या जिल्ह्यातच संधी उपलब्ध होतील. उद्योगांच्या उभारणीबरोबरच तंत्रशिक्षण, कौशल्यविकास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिल्यास विकासाचा लाभ व्यापक समाजघटकांपर्यंत पोहोचू शकेल. परिवर्तनाला गती देताना गडचिरोलीच्या पर्यावरणीय वैशिष्ट्यांचे भान राखणे अपरिहार्य आहे. येथील घनदाट जंगले, नद्या, जैवविविधता आणि आदिवासींची पारंपरिक जीवनपद्धती ही या जिल्ह्याची खरी संपत्ती आहे.
औद्योगिकीकरणात त्यांचे संरक्षण झाले पाहिजे. स्थानिकांचे विस्थापन टाळून त्यांना विकासात भागीदार करणे, रोजगारात प्राधान्य देणे आणि पर्यावरणपूरक उद्योगांना प्रोत्साहन देणे ही शासनाची जबाबदारी आहे. औद्योगिक प्रगती आणि निसर्गसंवर्धन यांचा समतोल साधला, तरच गडचिरोलीचा विकास शाश्वत ठरेल. गडचिरोलीच्या वाट्याला आलेला हा बदल एका दिवसात घडलेला नाही. सुरक्षा दलांचे परिश्रम, स्थानिक जनतेची शांततेची आकांक्षा आणि शासनाचे प्रयास यांच्या एकत्रित परिणामातून परिवर्तनाची पहाट उजाडत आहे. आता गरज आहे ती या संधीचे समृद्धीत रूपांतर करण्याची. भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वाभिमानाच्या विचाराला विकासाच्या संधींची जोड मिळाली, तर गडचिरोलीतील आदिवासी समाज केवळ प्रगतीचा साक्षीदार नव्हे, तर त्या प्रगतीचा शिल्पकार बनेल. बंदुकीच्या सावटातून आत्मविश्वासाच्या प्रकाशाकडे आणि नैसर्गिक संपन्नतेतून आर्थिक समृद्धीकडे होणारा गडचिरोलीचा हा प्रवास महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. गडचिरोलीचा नवा सूर्योदय ही केवळ एका जिल्ह्याची आशा नाही, तर सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेची कसोटीही आहे..!
Read About : Lakhpati Didi Yojana : सबलीकरणाचा खरा अर्थ
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.